पन्हाळा : प्रतिनिधी
कामदा एकादशी ते दिनांक २७ एप्रिल रोजी झालेल्या पाकाळणीच्या रविवार पर्यंत जोतिबाची चैत्र यात्रा सुरु होती. या चैत्र यात्रेची मंगळवारी जोतिबा डोंगरावर गावभंडाऱ्याने सांगता करण्यात आली. हजारो भाविकांनी आणि ग्रामस्थांनी या गावभंडाऱ्यातील महाप्रसादाचा लाभ घेतला. गावभंडाऱ्यानिमित जोतिबा मंदिरात विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते.
८ एप्रिल रोजी झालेल्या कामदा एकादशी दिवशी जोतिबा चैत्र यात्रेला सुरवात झाली होती. १२ एप्रिल रोजी चैत्र यात्रेचा मुख्य दिवस होता. सोमवारी जोतिबा मंदिरात पाकाळणी साजरी करण्यात आली. आशा सलग २१ दिवस चाललेल्या चैत्र यात्रेची सांगता मंगळवारी गावभंडाऱ्याने करण्यात आली. मंगळवारी दुपारी १२ वाजता महानैवेद्याच्या शोभायात्रेला सुरवात झाली. उंट ,घोडे ,वाजंत्री, सर्व देवसेवक च्या लवाजमासह हि शोभायात्रा यमाई मंदिराकडे गेली. यावेळी श्रींचे पुजारी, मानाचे दहा गावकर, देवस्थान समितीचे प्रभारी व्यवस्थापक धैर्यशील तिवले, सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे प्रभारी अजित झुगर, ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते.
गावभंडाऱ्यानिमित्य गावातील पुजारी मंडळाच्या सासन काठीच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी एक वाजता महाप्रसाद वाटपास सुरवात करण्यात आली. या महाप्रसादाचा लाभ घेण्यसाठी भाविकांनी आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. रात्री ११ वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप सुरु राहील..
——————————————————————————————-



