प्रसारमाध्यम विशेष….
“माध्यमं बदलतायत हो, आणि आपल्याला अजूनही लोकसत्तेच्या शेवटच्या पानाची सवय आहे !”
आधीचं मधुर जीवन : कधी काळी सकाळचं सौंदर्य म्हणजे खमंग चहा, बिस्कीट, आणि ‘लोकमत’, ‘सकाळ’ किंवा ‘पुढारी’! जोवर पानं वळायची नाहीत, तोवर दिवस सुरुच व्हायचा नाही.
पेपर वाचणं म्हणजे जगाचं कुतूहल समजून घेण्याचा एक संस्कारी सोहळा होता. पण आता ?
चहा गरम होईपर्यंत Instagram वर 4 रील्स, 2 स्टोरीज आणि WhatsApp वर ‘त्या’ ग्रुपमधली नवीन Breaking News – एवढं सगळं झालेलं असतं!
आता ‘बातमी’ ही बातमीदारांकडून येत नाही – ती आपल्यासारख्या सामान्य जनतेकडून ‘रिल्स’मध्ये झळकते!
‘मोबाईल’ = ‘प्रेस कार्ड’
आपल्या गल्लीतला रामू पानवाला आता रील्स बनवतो – “या पाहा मंडळी, शाळेच्या गेटवर गटार फुटलंय!” आणि त्यावर 20K व्ह्यूज येतात. पुढे त्याचाच एक यूट्यूब चॅनल होतो – “गावचा रिपोर्टर रामू भाई!”
काय बोलावं आता – सिनेमा कुठंय आणि लाईव्ह रिपोर्ट कुठंय, फरकच उरलेला नाही!
पारंपरिक पत्रकारांसाठी ‘पासवर्ड’ बदलला !
पूर्वी पत्रकार म्हणजे डायरी, पेन, आणि खांद्यावर झोळी असलेला गड्याचं चित्र मनात यायचं.
आता पत्रकार म्हणजे ring light, wireless mic, आणि ‘लाइव चालू आहे का ?’ असं विचारणारा यूट्यूबर !
त्याच्या बातमीत थोडं मनोरंजन आहे, थोडं रोष आहे, आणि भरपूर views आहेत !
समाजाचे आवाज – आता आवाजातच नाही, व्हिडिओतही आहेत !
हे सगळं फक्त गंमत म्हणून न बघता थोडं विचार केलंत, तर लक्षात येईल – समाजाच्या खालच्या थरांमध्येही आता माध्यमं पोचतायत.
कोणत्याही गावात, दलित वस्तीत, आदिवासी भागात – कोणी तरी Instagram लाईव्ह येतोय. त्याच्याकडे असलेली समस्या पूर्वी टी. व्ही. वर पोचत नसे. आता मात्र तो स्वतःचं स्टुडिओ बनवून बोलतोय – आणि आपल्यालाही ऐकावं लागतंय !
ही आहे खरी लोकशाही – पण ती HD मध्ये आणि 5G स्पीडमध्ये !
पण ‘फॉरवर्ड’ की ‘फॅक्ट’? हे ओळखणं कठीणच झालंय !
हल्ली सोशल मीडियावर ‘फॉरवर्ड’ येतो – “हा व्हिडिओ पहा, कोल्हापूरात वादळ !”
पाहिलं की समजतं, तो बर्फातला ड्रोन शॉट आहे आणि कॅप्शनमध्ये ‘कोल्हापूर’ असं कोणीतरी लिहिलेलंय.
म्हणजे बातमी खरी आहे की ‘फोटोशॉपची करामत’ आहे – हे सांगायला आता फॅक्ट चेक करायला शिकावं लागतंय.
म्हणूनच, पत्रकार होणं आणि ‘जवाबदार’ पत्रकार होणं यात फरक आहे.
मोबाईल, माईक आणि मस्त editing app असणं पुरेसं नाही.
लोकांचं विश्वास जपणं – ही खरी बातमीची परंपरा आहे.
लोकांचा आवाज बनणं – हे खरं माध्यम असण्याचं सौंदर्य आहे.
आणि बातमीत विनोद, भावना, आणि माहिती यांचं समतोल असणं – ही काळाची गरज आहे !
थोडी गंमत, थोडं गांभीर्य – आणि बऱ्याच विचारांची गरज !
चूकून समोरच्या मुलाच्या कॅमेऱ्यात आपण दिसलो, तर आपल्याला वाटतं – “मी पण स्टोरीत गेलो का?”
असं ‘सहभागी पत्रकार’ व्हायचंय का? तर थोडी विचारशीलता लागेल.
बातमी मिळाली, की लगेच शेअर करण्याआधी 3 सेकंद विचार करा
“ही बातमी खरंच लोकांना उपयोगी आहे का?”
“की ही फक्त पुढं ढकलायची गंमत आहे?”
“प्रसारमाध्यम आता आपल्याच हातात आहे!”
या नव्या माध्यमक्रांतीत, प्रत्येकाच्या हातात माईक आहे – पण ज्याचं बोलणं समजून घेऊन उत्तर दिलं जातं, तोच खरा ‘माध्यम’.
— म्हणूनच, ‘प्रसारमाध्यम’ म्हणतो –
बातमी शेअर करा, पण आधी ती वाचा.
लाईव्ह येताय? तर थोडं विचारून बोला.
अन बघणाऱ्यांनो, हसा, पण डोळे उघडे ठेवा
————————————————————————————————