कोल्हापूर: प्रसारमाध्यम न्यूज
दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेला शुक्रवार (ता.११) पासून प्रारंभ होत आहे. शनिवारी ( ता.१२) यात्रेचा मुख्य दिवस आहे. शनिवारी पहाटे पाच वाजता शासकीय अभिषेक होणार आहे. दुपारी बारा वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.
मंदिर परिसरात बांधलेल्या नव्या दर्शन मंडपातून भाविकांसाठी रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन मंडपातील चार मजले दर्शन रांगेसाठी वापरण्यात येणार आहेत. हवा खेळती राहण्यासाठी पंखे बसविण्यात आले आहेत. मंदिरात पुरेशी हवा खेळती रहावी याकरिता स्मोक एक्सट्रेक्टर बसविण्यात आला आहे. सिंधिया ट्रस्ट कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय येथे आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या ठिकाणी पोलीस सर्च टॉवर उभे केले आहेत. यात्रेसाठी देवस्थान व्यवस्थापन समिती आणि प्रशासन सज्ज झाले आहे.
पन्हाळा, कोल्हापूर व इतर ठिकाणच्या अग्निशामक दलाची पदके तैनात केली आहेत. प्रशासनाकडून रंगीत तालीम पूर्ण झाली असून, अन्न औषध प्रशासनाकडून तपासणी करण्यात आली आहे.
पार्किंग, अन्नछत्र , दर्शन, दान व्यवस्था सुरक्षेसाठी सीसीटीव्ही पोलीस बंदोबस्त, पाण्याची सोय, आरोग्य स्वच्छता, लाईव्ह दर्शन व्यवस्थेची कामे पूर्ण झालेत. गुरुवारी प्रशासनाची नियोजनबद्ध रंगीत तालीम झाली.
पार्किंग व्यवस्था
ज्योतिबा डोंगर परिसरात ३४ अधिक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे २४ तास वाहतूक पोलीस ही तैनात असणार आहेत. त्यामुळे भाविकांची गैरसोयी टाळली जाईल. असे पोलीस दलाने सांगितले.
सासनकाठी धारकांसाठी स्वतंत्र वाहन तळ व दर्शनासाठी स्क्रीन
सासनकाठी धारकांना स्वतंत्र वाहनतळ तयार केले आहे. त्यात पाण्यासह इतर सुविधा आहेत. स्वच्छता सेवा पुरवण्यात येत आहेत. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी यात्रे दिवशी ठिक ठिकाणी लावलेले स्क्रीन द्वारे श्री जोतिबा देवाचे लाईव्ह दर्शन होणार आहे. यात्रा काळात वीज खंडित झाल्यास मोठ्या जनरेटरची सोय केली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे, बॉम्ब शोधक व नाशिक पथक अग्निक्षमक दलाची व्यवस्था केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ.महेंद्र पंडित यांनी अन्य जिल्ह्यातून देखील बंदोबस्त मागवला आहे. पोलीस अधीक्षक, एक अपर अधीक्षक, दोन उपाधीक्षक, सहा निरीक्षक, २५ उपनिरीक्षक, ७० महिला पोलीस, वाहतूक पोलीस, शिघ्रकृती दल, आरसीपी होमगार्ड, एसआरपी असे दोन हजार पोलीस तैनात असणार आहेत
गायमुखा वरील अन्नछत्र सुरू
यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी यावर्षीही सहज सेवा स्वच्छ अन्नछत्राला प्रारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी असंख्य भाविकांनी लाभ घेतला. प्रथम येणाऱ्या ज्योतिबा भक्तांचे हस्ते चांगभल च्या गजरात अन्नछत्र सेवा सुरू करण्यात आली. जेवणाबरोबर चहा आणि मठा याचीही सोय करण्यात आली आहे. भक्तांच्या सेवेसाठी सोमवारी बैलगाडीसाठी पेंड वाटप करण्यात येणार आहे. हे अन्नछत्र दिनांक १३ पर्यंत सुरू राहणार आहे. अन्नछत्रासाठी चारशेहून अधिक स्वयंसेवक सेवा देत आहे.
खोबऱ्याचे तुकडे करून आणावेत
भाविकांनी खोबरे हे वाटी स्वरूपात न आणता तुकडे करून आणावेत. व्यापाऱ्यांनीही खोबऱ्याचे बारीक तुकडे करून विक्री करावी. प्लास्टिक बंदी बाबत प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचना केल्या आहेत त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे देवस्थान समितीने सांगितले.



