पन्हाळा : प्रतिनिधी
श्री क्षेत्र जोतिबा डोंगर ते श्री यमाई (औंध ता. खटाव) दर्शन पायी दिंडी मोठया धार्मिक उत्साहात मार्गस्त झाली. दर वर्षी श्रावण महिन्यात जोतिबा ते औंध पायी दिंडी जोतिबाचे ग्रामस्थ पुजारी यांचे वतीने काढली जाते.
गुरुवारी सकाळी जोतिबा डोंगर येथील श्री जोतिबा देवास अभिषेक, आरती करून जोतिबा ते औंध पायी दिंडीस प्रारंभ झाला. यंदा दिंडीचे हे २५वे वर्ष आहे. या दिंडी मध्ये जवळपास २०० ते २५० जोतिबाचे स्थानिक पुजारी व महिला सहभागी झाले आहेत. टाळ मृद्गग भगवा पताका आणि चांगभलंच्या गजरात ही दिंडी निघाली. दिंडीच्या मध्यभागी श्री. जोतिबा देवाच्या पादुका घेऊन दिंडी मार्गस्थ झाली. दिंडी मार्गावर दिंडी चे पाय पुजन आणि औक्षण करून स्वागत करण्यात आले.
पाच दिवसात ही दिंडी इस्लामपूर, सागरेश्वर, तडसर, गोरेगांव मार्गे औंध या ठिकाणी मुक्काम करीत १५० कि.मी.पायी चालत ही पायी दिंडी जाणार आहे. मंगळवारी २७ ऑगस्टला श्री. क्षेत्र औंध च्या यमाई देवीला महाभिषेक करून या ठिकाणी होमहवन होणार आहे. महाप्रसाद वाटपाने दिंडी सोहळ्याची सांगता होणार असल्याची माहिती मच्छिंद्र डवरी यांनी सांगितली .