Sugarcane is being processed in this way in the Kurundwad area. Due to this, sugarcane is getting a good price.
अनिल जासुद : कुरुंदवाड
आश्चर्यचकित झालात ना….होय ! हे खरं आहे……मात्र हा दर कोणत्या साखर कारखान्याने शेतकर्याला दिलेला नाही…तर तो दर दिलाय…. शेतकर्यांनी ……शेतकर्यालाच. तर बातमी अशी आहे की, शिरोळ तालुक्यातील शेतकरी वर्ग सध्या आडसाली ऊसाची लागण करण्याच्या तयारीत आहे. या लागणीसाठी त्याला चांगल्या प्रतीचा, चांगल्या जातीच्या ऊस बियाण्यांची आवश्यकता आहे. आणि ज्या काही शेतकर्यांकडे चांगल्या जातीचा परिपक्व झालेला ऊस आहे, तो त्यांनी ऊस बियाण्यासाठी म्हणून विक्रीस काढलेला आहे.
विक्रीच्या उसाचा दर एकरकमी रोख ३५०० ते ३७०० रुपयापर्यंत. व्हरायटी व जातीनुसार याचा दर कमी -जास्त प्रमाणात आहे. काही शेतकरी रोपवाटीकातील उसाची रोपे घेऊन लागण करतात. तर काही शेतकरी ऊसाच्या कांडीने लागण करतात. असे ऊस बियाणे काही शेतकरी मोळीच्या प्रमाणात तर काही टनावर खरेदी करतात. साधारणपणे बारा ते तेरा ऊसाच्या एका मोळीला शंभर रुपये दर आहे. याप्रमाणे एकरी ऊस लागण करण्यासाठी साधारणपणे पन्नास ते पंच्चावन मोळ्या लागतात. तर टनावर खरेदी करणार्या शेतकर्यांना लावण करण्यासाठी एकरी दीड टन ऊस लागतो.
रोपवाटीकामध्ये एक ऊस रोप दोन रुपयाला आहे. व्हरायटीनुसार ऊसरोपांचा दर कमी जास्त आहे. रोपलावण करणार्या शेतकर्यांना साधारण एकरी पाच ते सहा हजार ऊसरोपे लागतात. हे प्रमाण सरीमधील रुंदी व दोन कांडी पेरण्यामधील अंतर यानुसार कमी जास्त होऊ शकते.
ऊसरोप लावण केलेल्या शेतकर्यांची ऊस नोंद कारखाना एक महिना अगोदरची तारीख टाकून घेते. साखर कारखान्याकडून चांगला उतारा देणार्या जातीचे बियाणे पुरवण्यावर भर देण्यात येत आहे. साधारणपणे जून, जुलै, ऑगस्ट मध्ये केली जाणारी लागण ही आडसाली लागण म्हटली जाते. सप्टेंबर , ऑक्टोबर मध्ये केली जाणारी लागण ही पुर्व हंगामी म्हटली जाते.मे च्या अखेरीस व जुन मध्ये तालुक्यात दमदार पाऊस झाल्यामुळे शिवारात आडसाली ऊस लागण करण्यासाठी शेतकर्यांची लगबग सुरु आहे.