कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकरी आणि लघु व मध्यम उद्योजक यांना कर्ज मिळविणे अधिक सुलभ होणार आहे.
सोने किंवा चांदी गहाण ठेवून शेती आणि लघु व मध्यम उद्योजक क्षेत्रातील व्यक्तींना २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देता येईल अशी परवानगी रिझर्व्ह बँकेने एका नव्या सूचनेद्वारे बँकांना दिली आहे. या निर्णयामुळे ज्यांच्याकडे पुरेशी जमीन किंवा औपचारिक दस्तऐवज नाहीत, पण सोनं किंवा चांदी आहे, अशांना कर्ज घेण्याचा मार्ग खुला होणार आहे.
याआधी काहीही तारण न ठेवता कर्ज घेण्याची मर्यादा होती पण, आता कोणी स्वतःहून सोने किवा चांदी ठेवू इच्छित असेल तर बँक त्याला नकार देऊ शकत नाहीत, असा आदेश जारी केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील शेतकरी आणि लहान व्यावसायिकांना होईल.
११ जुलैला जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, शेतकरी किंवा व्यावसायिकाने स्वेच्छेने मागणी केल्यास बँका २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सोने आणि चांदी गहाण ठेवू शकतील. एका बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “या नवीन नियमामुळे जर कोणी त्याचे सोने किंवा चांदी गहाण ठेवली तर त्याला काहीही गहाण न ठेवता कर्ज घेण्याच्या फायद्यापासून वंचित ठेवले जाणार नाही याची खात्री होईल.” म्हणजे आता लोकांना छोटे उद्योग किंवा शेतीसाठी सहज कर्ज मिळू शकेल. या बदलामुळे गाव-खेड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना खूप फायदा होईल. सोने ही खेड्यांमध्ये सर्वात सहज उपलब्ध होणारी संपत्ती आहे.
लाभधारक कोण होऊ शकतो : ग्रामीण भागातील शेतकरी, लघु व मध्यम उद्योगांचे उद्योजक, ज्या व्यक्तींकडे जमीन नसून, परंतु सोनं/चांदी आहे, अशा अनौपचारिक क्षेत्रातील कामगार किंवा उद्योजक.
याचा उद्देश : ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे, शेतकऱ्यांना आणि लघु उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणे, पारंपरिक कर्ज प्रक्रियेला पर्याय देऊन, सहज आणि जलद कर्ज उपलब्ध करून देणे.
अटी कोणत्या : गहाण ठेवलेले सोने/चांदी बँकेच्या नियमांनुसार मूल्यांकन केले जाईल. कर्जाची कमाल मर्यादा २ लाख रुपये असेल. ही योजना फक्त शेती व लघु व मध्यम उद्योगांशी संबंधित गरजांसाठीच लागू असेल. कर्जाच्या परतफेडीची मुदत व व्याजदर बँक ठरवतील.