कसबा बीड : प्रसारमाध्यम न्यूज
शिलाहार राजवंशाची उपराजधानी आणि ऐतिहासिक लष्करी तळ म्हणून ओळखले जाणारे कसबा बीड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मृग नक्षत्राच्या काळात येथे यादवकालीन सुवर्णमुद्रांचे (बेडा) दर्शन झाले असून, या परिसरातील ऐतिहासिक महत्त्व आणि पुरातन वारसा अधोरेखित झाला आहे.
यंदाच्या वर्षी ही अशी तिसरी घटना नोंदली गेली आहे, ज्यात कसबा बीडमध्ये सोन्याच्या वस्तू सापडल्यात. यामुळे स्थानिक लोककथांना नवा आधार मिळत असून, संशोधनासाठी महत्त्वाची सुरुवात झाली आहे.
आक्काताई जाधव यांना सापडला ‘बेडा’
‘जाधव मळा’ येथील शेतात आक्काताई आनंदा जाधव भांगलण करत असताना त्यांना जमिनीत चमकणारी वस्तू दिसली. अधिक खोलवर पाहणी केली असता त्यांना एक यादवकालीन सुवर्णमुद्रा, म्हणजेच ‘बेडा’, सापडला. या नाण्याचा आकार बशीसारखा असून, याचे वजन ३.७५ ग्रॅम व लांबी १.७ सेमी आहे. विशेष म्हणजे या नाण्याची मागील बाजू कोरी असून, याचा संबंध १२ व्या ते १४ व्या शतकातील यादव राजवटीशी आहे. या नाण्याचा प्रकार ‘गद्यन’ असून, हा मध्ययुगीन सुवर्ण चलनाचा भाग होता.
तानाजी यादव यांना सापडला दागिन्याचा तुकडा
लक्ष्मी मंदिर परिसरातील शेतात घडली. तानाजी बाबू यादव यांना येथे काम करत असताना ०.४५ ग्रॅम वजनाचा एक प्राचीन दागिन्याचा तुकडा सापडला. या तुकड्यावर अत्यंत सूक्ष्म आणि अलंकारिक आकृत्यांचे अंकन असून, ते पाहून स्थानिक पुरातत्त्वप्रेमी थक्क झाले आहेत. इतक्या लहान तुकड्यावर इतकं बारीक कोरणं हे त्या काळच्या सोनारांच्या कौशल्याचे प्रतिक मानले जात आहे.
ऐतिहासिक वारसा जोपासणारे कार्य
‘सुवर्णराजधानी कसबा बीड’ ही स्थानिक युवकांची संस्था अशा सापडलेल्या ऐतिहासिक नाण्यांची माहिती संकलित करत असून, या घटनांची नोंद करून पुढील संशोधनासाठी ती तज्ज्ञांकडे सुपूर्द करत आहे. यामुळे कसबा बीडचा पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक महत्त्व अजून ठळक होत आहे.
या वारंवार सापडणाऱ्या नाण्यांमुळे आणि दागिन्यांमुळे, कसबा बीडचा भूगर्भ अजून किती रहस्ये लपवून बसलाय, याची उत्सुकता आता सर्वच स्तरांवर वाढली आहे. हे केवळ पुरातत्त्वीय नाही, तर सांस्कृतिक दृष्ट्याही एक मोठं धन आहे, ज्याच्या संवर्धनासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे.
—————————————————————————————-