मुंबई : विशेष प्रतिनिधी
इस्त्राएल आणि इराण यांच्या दरम्यान सुरू असलेल्या युद्धावर भारताने कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. भारताने अशा पद्धतीची तटस्थ भूमिका घेणे अयोग्य असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
शरद पवार – इराण आणि इस्त्राइल युद्धात भारताने बघ्याची भूमिका घेणे हे अचंबित करणारे आहे. अरब देशात मोठ्या प्रमाणावर भारतीय कामगार काम करतात. शिवाय तेलाच्या आयातीवर ही यामुळे परिणाम होणार आहे. अशा स्थितीत कोणतीही भूमिका न घेणे योग्य नाही. त्याचे दुरगामी परिणाम भारतावर होणार असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.
हिंदीची सक्ती नको पण शिकणे आवश्यक
राज्यात सध्या हिंदी भाषेच्या सक्तीवरुन घमासान सुरु असतानाच शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुलांवर तिसऱ्या भाषेचे ओझे नको, हिंदी भाषेची सक्ती नको, पण हिंदी भाषा शिकणे महत्वाचं आहे असे पवार यांनी म्हटल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पहिलीच्या मुलांवर तिसऱ्या भाषेचं ओझे आणि हिंदी भाषेची सक्ती नको, परंतु हिंदी भाषा शिकणे महत्वाचे आहे. देशात ५५ टक्के हिंदी भाषा बोलणारे लोकं आहेत. सध्या पाचवीपासून पुढे हिंदी भाषा शिकवली जाते, असे पवार यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, हिंदी भाषेबाबत अहवाल मागवण्यात आला असून येत्या आठ दिवसात यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
——————————————————————————————–



