प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य तणावाचा परिणाम स्थानिक सराफा बाजारावरही जाणवू लागला आहे. सुवर्णबाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाली.
काल (20 मार्च) सोन्याचे दर जीएसटीविना ₹1,48,000 प्रति तोळा होते. त्यात आज ₹4,000 ची घसरण होऊन दर ₹1,44,000 वर आले. चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवली गेली असून, ₹2,36,000 वरून ₹2,30,000 पर्यंत दर खाली आले आहेत.
व्यापाऱ्यांच्या मते, Israel-Iran Conflict पार्श्वभूमीवर डॉलर इंडेक्स मजबूत होत आहे, तर भारतीय रुपयाची किंमत घसरत आहे. यामुळे गुंतवणूकदार सोन्या-चांदीऐवजी इतर पर्यायांकडे वळत असल्याचे दिसत आहे.
कमोडिटी बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सध्या बाजारावर मंदीचा दबाव कायम असून व्याजदर वाढ आणि महागाईची चिंता यामुळे सोन्याच्या किमतींवर मर्यादा येत आहेत. नजीकच्या काळात सोन्याची किंमत ₹1,40,000 ते ₹1,47,000 या दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मध्यपूर्वेतील तणाव कायम राहिल्यास आगामी काळात सोनं-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.






