कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सध्या आयपीएलचं १८ वे पर्व सुरु असून यात एक बदल करण्याच्या तयारीत बीसीसीआय असल्याचं दिसून येत आहे. २०२८ पासून आयपीएल स्पर्धेत नेहमी पेक्षा अधिक सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे.
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलची लोकप्रियता जगभर पसरली आहे. या लीग स्पर्धेत खेळण्यासाठी दिग्गज खेळाडू उत्सुक असतात. आयपीएल २०२५ स्पर्धा अर्थात १८ वं पर्व आता रंगतदार वळणावर आले आहे. ४६ सामन्यांचा खेळ संपल्यानंतर प्लेऑफची लढाई चुरशीची झाली आहे. प्रत्येक सामन्याच्या निकालाचा परिणाम गुणतालिकेवर थेट होताना दिसत आहे. असं सर्व सुरु असताना बीसीसीआयच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आहे. आयपीएल स्पर्धेत एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
आयपीएलचे चेअरमन अरूण धूमल यांनी आयपीएल स्पर्धेतील मोठ्या बदलाचे संकेत दिले आहेत क्रीडारसिकांचा आनंद द्विगुणित होणार आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय आयपीएल २०२८ पासून आयपीएल स्पर्धेतील सामन्यांची संख्या वाढवण्याच्या तयारीत आहे. सध्या आयपीएल स्पर्धेत अंतिम फेरीसह ७४ सामने खेळले जात आहे. मात्र, २०२८ पासून आयपीएल स्पर्धेत ९४ सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे. आयपीएल स्पर्धा जवळपास दोन महिने चालते. त्यामुळे ९४ सामन्यांचा वेळापत्रक बसवण्यासाठी तजवीज करावी लागणार आहे. जास्तीत जास्त डबल हेडर सामने खेळवावे लागण्याची शक्यता आहे.
आयपीएलमध्ये नवा संघ खेळण्यास येईल की नाही याबाबत अजून काही स्पष्टता नाही. दरम्यान, आयपीएल २०२५ स्पर्धेत ८४ सामने खेळवण्याचा विचार सुरु होता. मात्र, प्रत्यक्षात तसं करणं शक्य झालं नाही. डबल हेडर सामन्यांची संख्या पाहता तसं करता आलं नाही. आयपीएलचे चेअरमन अरूण धूमल यांनी ईएसपीएलन क्रिकइन्फोशी बोलताना सांगितलं की, बीसीसीआय पुढच्या मिडिया राइट्स चक्रापासून ९४ सामन्यांच्या फॉर्मेटबाबत विचार करत आहे. हे चक्र २०२८ पासून सुरु होणार आहे. आम्ही याबाबत आयसीसीसोबत चर्चा करत आहोत. तसेच बीसीसीआयमध्ये यााबबत चर्चा होत आहे.