कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
अरुण जेटली स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांचा गेल्या सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे कमबॅकसाठी चुरस पाहायला मिळणार आहे.
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 32 व्या सामन्यात आज 16 एप्रिलला दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. अक्षर पटेल याच्याकडे दिल्लीचं तर संजू सॅमसन याच्याकडे राजस्थानच्या नेतृत्वाची धुरा आहे. दोन्ही संघांना त्यांच्या गेल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे दिल्ली आणि राजस्थानसमोर कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे. या सामन्याचं आयोजन हे दिल्लीच्या घरच्या मैदानात अर्थात अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. दिल्लीची या मोसमात अप्रतिम सुरुवात झाली. मात्र पाचव्या सामन्यात विजयाची मालिका खंडीत झाली. तर राजस्थानचा अडखळता प्रवास सुरु आहे. त्यामुळे या दोघांपैकी आता कोण यशस्वी ठरतं? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
राजस्थानसमोर दिल्लीचं आव्हान
राजस्थानचा हा या मोसमातील सातवा तर दिल्लीचा सहावा सामना आहे. राजस्थानने सलग 2 सामने गमावले. त्यानंतर सलग 2 सामने जिंकत दणक्यात कमबॅक केलं. मात्र पुन्हा तेच. राजस्थानला सलग 2 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे राजस्थानची कामगिरी पाहता ते सातत्य ठेवण्यात अपयशी ठरलेत हे सिद्ध होतं. त्यामुळे राजस्थानला कमबॅक करण्यासाठी दिल्लीला रोखण्याचं आव्हान असणार आहे.
दिल्ली पराभवानंतर मुसंडी मारण्यासाठी सज्ज
दुसऱ्या बाजूला दिल्लीने अक्षर पटेल याच्या नेतृत्वात या हंगामात तडाखेदार कामगिरी केली. दिल्लीने सलग 4 सामने जिंकले. मात्र त्यानंतर विजयासाठी चाचपडणाऱ्या मुंबई इंडियन्स टीमने दिल्लीचा झंझावात रोखण्यात यश मिळवलं. मुंबईने सलग 4 सामने जिंकणाऱ्या दिल्लीला लोळवलं आणि या मोसमातील एकूण दुसरा विजय मिळवला.
दिल्लीकडे पुन्हा नंबर 1 होण्याची संधी
दरम्यान दिल्लीकडे राजस्थानविरुद्ध विजय मिळवून पॉइंट्स टेबलमध्ये पुन्हा एकदा नंबर 1 होण्याची संधी आहे. ताज्या आकडेवारीनुसार,दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये 4 विजय आणि 8 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. दिल्लीचा नेट रनरेट हा +0.899 असा आहे. तर राजस्थानला 6 पैकी फक्त 2 सामने जिंकता आले आहेत. राजस्थान 4 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता राजस्थान एकूण तिसरा विजय मिळवणार की दिल्ली 10 पॉइंट्स पूर्ण करणारी पहिली टीम ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.