मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
जागतिक स्तरावर व्यापार युद्ध आणि टॅरिफ वॉर मुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या काळात महाराष्ट्राने गुंतवणुकीच्या आघाडीवर मोठी झेप घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य सरकारने विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांसोबत ३४,४७४ कोटी रुपयांच्या १७ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. या गुंतवणुकीमुळे राज्यात तब्बल ३३,००० नवीन रोजगार निर्मिती होणार असून, प्रादेशिक विकासाला नवी चालना मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य
या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “जगभरात अमेरिका, चीन, जपान आणि युरोपियन युनियन यांच्यात टॅरिफ वॉर सुरू आहे. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे आणि गुंतवणुकीत अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा वातावरणात महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असल्याने गुंतवणूकदारांचा आमच्या राज्यावर असलेला अढळ विश्वास दिसून येतो.”
कुठे किती गुंतवणूक ?
-
उत्तर महाराष्ट्र ( नाशिक, अहमदनगर, नंदुरबार ) : ९,८६६ कोटी रुपयांचे ५ करार
-
पुणे विभाग : ११,९६६ कोटी रुपयांचे ५ करार (सर्वाधिक)
-
विदर्भ (गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर) : ११,६४२ कोटी रुपयांचे ६ करार
-
रायगड : ३,००० कोटी रुपयांची स्वतंत्र गुंतवणूक