अंतराळातील प्रवासासाठी विविध संशोधन होत आहे. पृथ्वीवरून मानव चंद्रावर गेला, अंतराळात चालू शकला, मंगळावर यान जाऊ शकले. यानातून अंतराळात जाणे, रहाणे, परत येणे, शक्य झाले. एकच यान अंतराळात जाऊन परत लॅन्ड होणे व त्याचा पुन्हा वापर करणेही शक्य झाले आहे. फक्त परी कल्पना असणारा हा प्रवास तंत्रज्ञानातील प्रगती मुळे मानवाला शक्य वाटू लागला आहे. अंतराळात वसाहती उभारणे, त्यांचे पुढे काॅलनीत रूपांतर होणे, त्यांच्या साठी विविध सेवा पुरवणे व आर्थिक उद्योग सुरू होणे शक्य असेल असे अनेकांचे मत आहे.
एलोन मस्क च्या ‘स्पेस X’ ने एकच यान प्रक्षेपित करून पुन्हा सुरक्षितपणे लॅड करून दाखवले. मस्क तर मानवाच्या मंगळा वर वसाहतीचे स्वप्न बाळगून आहे. यात लागणारा वेळ व इंधनाचा खर्च या प्रमुख अडचणी आहेत. वेगवेगळ्या इंधनाचे प्रयोग या साठी होत आहेत.
प्रचंड ताकदीची अणू -उर्जा अणूचे नियंत्रित फ्युजन करून वापरली तर यानाचा अवकाशातील प्रवासाचा वेळ निम्यावर येउ शकतो व खर्चही कमी होउ शकतो म्हणजे मंगळावर-मार्स वर पोहोचण्यास सध्या 3 वर्षाऐवजी 1.5 दीड वर्षात पोहोचता येईल तरी तर प्लूटो वर पोहोचण्यासाठी 9.5 वर्षे लागतात त्या ऐवजी 4 वर्षांतच पोहोचता येईल असे तंत्रज्ञान आपण विकसित करत आहोत असे ब्रिटिश स्टार्ट’ – अप कंपनी ‘पल्सर फ्युजन ‘ने जाहीर केले आहे.
परंतू हे न्यूक्लिअर फ्युजन पृथ्वीवर करण्याऐवजी अवकाशातील निर्वात पोकळीत करणे जास्त सोपे. म्हणून अवकाशातच न्यूक्लिअर फ्युजन करून राॅकेटस् ना उर्जा देण्याचा क्रांतीकारक दावा ब्रिटिश स्टार्ट अप ‘पल्सर फ्युजन ‘ने केला आहे. अंतरीक्ष प्रवासातील हा बदल पल्सर फ्युजन घडवणार आहे आपल्या ‘सनबर्ड’ या न्यूक्लिअर फ्युएल वर चालणा-या राॅकेट द्वारे !
या ‘सनबर्ड’ राॅकेटस् ना न्यूक्लिअर एनर्जी पुरवण्यासाठी ड्युएल (दोन) डायरेक्ट फ्युजन ड्राईव्ह इंजिन्स वापरली जातील. यात हेलियम -3 व ड्युटेरीयम यांचा एकत्र वापर होईल. याची चार्जिंग स्टेशन्स (जशी ईलेक्ट्रीक वाहनांची असतात तशी) अंतराळात स्थापित केली जाउ शकतात असा दावा पल्सरचे संस्थापक रिचर्ड डिनान यांनी केला आहे. 2027 पर्यंत हे कार्यान्वित होउ शकते असा ही त्यांचा विश्वास आहे. म्हणजे सनबर्ड राॅकेट अंतराळातच तुमच्या राॅकेट ला कनेक्ट होऊन तुमचे इंधन वापरण्या ऐवजी सनबर्ड च्या इंधनात निम्या वेळेत व निम्या खर्चात पोहोचवू शकते.
सनबर्ड हे पुन्हा उपयोगात येणारे अंतराळयान आहे. जे अंतराळात पृथ्वीच्या ऑर्बिट मधे (भ्रमण कक्षेत)असेल व इतर अंतराळ वाहनाशी जोडले जाउन एखाद्या ‘टग बोटी’ सारखे ते वाहन अंतराळातील अफाट अंतरात खेचून नेईल.! ही ‘पल्सर फ्युजन’ कंपनी 2011 मधे स्थापन झाली. ब्लेचली, ग्रेट ब्रिटन येथे मुख्य कार्यालय आहे. अंतराळ प्रवासात( स्पेस जर्नी ) अभिनव बदल घडवून ग्रहांतर्गत अवकाशात प्रवासाचा वेळ कमी करणे असे आगळे वेगळे कंपनीचे ध्येय आहे.
कंपनीचा असा दावा आहे की प्लूटो पर्यंत 4 वर्षात पोहोचता येईल व मंगळास पोहोचण्यास लागणारा वेळ निम्यावर येउ शकेल. अनेक जणांनी याबाबत साशंकता व्यक्त केली असली तरी अनेक पूर्वी अशक्यप्राय व कपोलकल्पित वाटणा-या कल्पना सध्या आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत हे विसरून चालणार नाही.