spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeआंतरराष्ट्रीयपुण्याच्या भूजलतज्ज्ञाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

पुण्याच्या भूजलतज्ज्ञाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

डॉ. हिमांशू कुलकर्णी : भारतीय उपखंडातील पहिलेच शास्त्रज्ञ

पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

अमेरिकेतील ओक्लाहोमा विद्यापीठातील वॉटर सेंटरतर्फे प्रायोजित प्रतिष्ठेचा ‘आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार’ (International Water Award) पुण्यातील भूजलतज्ज्ञ डॉ. हिमांशू कुलकर्णी  यांना जाहीर झाला असून, हा सन्मान मिळवणारे ते भारतीय उपखंडातील पहिलेच शास्त्रज्ञ ठरले आहेत.

भारतातील शास्त्रज्ञ सातत्याने अथक परिश्रमातून संशोधनाची नवी क्षितिजे गाठत आहेत. अशाच तेजस्वी कामगिरीची नोंद आता पुण्यातील भूजलतज्ज्ञ डॉ. हिमांशू कुलकर्णी यांच्या नावावर झाली आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता क्षेत्राशी संबंधित जागतिक स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. विकसनशील देशांमधील गरिबीत जीवन जगणाऱ्या समुदायांना पाणी आणि स्वच्छतेच्या माध्यमातून दिलेल्या संशोधन, अध्यापन व सेवेसाठी हा आंतरराष्ट्रीय गौरव प्रदान केला जातो.
डॉ. कुलकर्णी यांना हा पुरस्कार मिळणार असल्याची घोषणा २०२४ साली झाली होती. यानुसार, १५ सप्टेंबर २०२५ रोजी अमेरिकेत झालेल्या समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. ट्रॉफी आणि २५ हजार अमेरिकन डॉलर्स ( सुमारे २२ लाख रुपये ) अशी या पुरस्काराची रक्कम आहे.
गेल्या अनेक दशकांपासून डॉ. कुलकर्णी भूजल व्यवस्थापन, संवर्धन आणि त्यासंबंधित सामाजिक उपक्रमांवर काम करत आहेत. ते नीति आयोगाच्या १२ व्या योजनेच्या कार्यगटाचे सह-अध्यक्ष होते, तसेच राष्ट्रीय जलचर मॅपिंग कार्यक्रमाच्या मसुद्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. पुण्यातील ‘अ‍ॅक्वाडाम’ (Advanced Center for Water Resources Development and Management) या संस्थेचे संस्थापक विश्वस्त आणि सचिव म्हणून त्यांनी अनेक अभिनव उपक्रम राबवले आहेत. याशिवाय, ते शिव नाडर इन्स्टिट्यूट ऑफ एमिनेन्स (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) येथे ग्रामीण व्यवस्थापन विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
“ हा पुरस्कार माझ्यासाठी वैयक्तिक गौरव नसून, अ‍ॅक्वाडाम आणि त्याच्याशी निगडित संस्थांनी भूजल व्यवस्थापनासाठी केलेल्या एकत्रित कामाचा परिपाक आहे,” असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. भारतातील वाढत्या भूजल संकटावर उपाय शोधायचा असेल, तर सखोल व्यवस्थापन आणि सामूहिक प्रयत्न हाच एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या सन्मानामुळे भारताच्या जलसंपत्तीविषयक संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली असून, पुण्याचे नाव जगभरात उज्ज्वल करणारी ही घटना ठरली आहे.

———————————————————————————————————————
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments