प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
भारताच्या वैभवशाली सागरी इतिहासाला पुन्हा उजाळा देणारी आणि प्राचीन जहाजबांधणी परंपरेचा सजीव प्रत्यय देणारी ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ ही विशेष नौका भारतीय नौदलात दाखल झाली असून, तिने सोमवारी आपला पहिलाच दीर्घ पल्ल्याचा ऐतिहासिक प्रवास सुरू केला. गुजरातमधील पोरबंदर येथून ओमानची राजधानी मस्कतकडे ही नौका रवाना झाली आहे. सुमारे १५ दिवसांत १,४०० किलोमीटर अंतर पार करण्याचे उद्दिष्ट असून, या प्रवासात १८ नौसैनिक सहभागी आहेत.
ही नौका केवळ एक जहाज नसून, भारताच्या २,००० वर्षांहून अधिक जुन्या सागरी व्यापार, जहाजबांधणी आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या परंपरेचे प्रतीक आहे. पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांच्या हस्ते या ऐतिहासिक मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी भारतातील ओमानचे राजदूत इस्सा सालेह अल शिबानी उपस्थित होते.
प्राचीन जहाजबांधणीचे अद्भुत उदाहरण
‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ ही ६५ फूट लांबीची नौका १५०० वर्षांपूर्वीच्या भारतीय जहाजबांधणी तंत्रावर आधारित आहे. विशेष म्हणजे या नौकेत
कोणतेही इंजिन नाही,
लोखंडी खिळे किंवा पोलादाचा वापर नाही,
आधुनिक वेगवर्धक यंत्रणाही नाही.
लाकडी फळ्या जोडण्यासाठी नारळाच्या काथ्यांपासून बनवलेल्या दोऱ्यांचा वापर करण्यात आला असून, पारंपरिक भारतीय शिवणतंत्र वापरून ही नौका साकारण्यात आली आहे. संपूर्ण प्रवास वाऱ्याच्या वेगावर आणि शिडांच्या साहाय्याने केला जाणार आहे.
अजंठा ते अरब सागर : इतिहासातून प्रेरणा
या जहाजाची संकल्पना अजंठा लेण्यांतील पाचव्या शतकातील भित्तिचित्रांपासून प्रेरित आहे. त्या चित्रांमधील प्राचीन जहाजरचनेचा सखोल अभ्यास करून नौदलातील अभियंते आणि जहाजबांधणी तज्ज्ञांनी आधुनिक संशोधनाच्या साहाय्याने ही नौका प्रत्यक्षात उतरवली.
डेकवर ठेवलेला हडप्पा संस्कृतीची आठवण करून देणारा दगडी नांगर, अग्रभागी कोरलेली सिंहाची पौराणिक आकृती, तसेच शिडांवर अंकित केलेला गंडाभेरुंड पक्षी आणि सूर्यचिन्ह ही सर्व प्रतीके भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे दर्शन घडवतात.
कौंडिण्य कोण होता? प्रेमकथा आणि सागरी पराक्रम
या नौकेला दिलेले नावही तितकेच अर्थपूर्ण आहे. कौंडिण्य हा प्राचीन भारतीय समुद्रवीर व व्यापारी होता. इतिहासानुसार, कौंडिण्यने समुद्रमार्गे आग्नेय आशियात प्रवास करून तेथील स्थानिक राजकन्येशी विवाह केला आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार केला. ही कथा केवळ प्रेमकथा नसून, भारतीय सागरी धाडस, व्यापारकौशल्य आणि सांस्कृतिक प्रभावाची साक्ष देणारी आहे.
ओमान का?
ओमानची निवड ही योगायोगाने नाही. प्राचीन काळी भारताचा समुद्री व्यापार ओमानमार्गे पश्चिम आशिया, आफ्रिका आणि युरोपपर्यंत पोहोचत असे. त्यामुळे हा प्रवास इतिहासाचे पुनरावलोकन आणि आधुनिक काळातील सागरी कूटनीतीचे प्रतीक मानला जात आहे. या मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
वारसा जपण्याचा नौदलाचा प्रयत्न
भारतीय नौदलाने या उपक्रमाद्वारे भारताच्या प्राचीन सागरी वारशाचे जतन, संशोधन आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ ही नौका केवळ समुद्रातला प्रवास करत नाही, तर भारताच्या सुवर्णयुगाच्या आठवणी पुन्हा जिवंत करत आहे.






