मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये तक्रारपेटी बसवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. याशिवाय पोक्सो ई बॉक्स आणि चिराग ॲप द्वारे बालकांच्या सुरक्षेसाठी ऑनलाईन तक्रारी सुद्धा दाखल करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देश शासन निर्णयाद्वारे देण्यात आले आहेत.
शालेय विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे लैंगिक शोषण होऊ नये अथवा त्यांचा मानसिक छळ होऊ नये यासाठी राज्य सरकारने आता कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश सर्व शाळा व्यवस्थापनांना शासन निर्णयाद्वारे दिले आहेत.
शासनाचे निर्देश –
* टोल फ्री चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ (किंवा बदललेला नवीन क्रमांक) – एका प्रमुख ठिकाणी प्रदर्शित केला जावा, जिथे मुले तो नोंदवू शकतील. या क्रमांकावर कधी आणि कोणत्या परिस्थितीत संपर्क साधता येईल याची माहिती मुलांना देण्यात यावी.
* शाळेच्या दृश्यमान भागात, शाळेच्या अंतर्गत संरक्षण भिंतीवर आणि शाळेच्या इमारतीवर विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबद्दल माहिती देण्यासाठी माहितीचे फलक, चित्रे किंवा डिजिटल डिस्प्ले बोर्ड वापरून प्रदर्शित केले जावेत.
* सर्व शाळांना चोहोबाजूंनी भिंती आणि मुख्य प्रवेशद्वार असावे.
* मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक असावा.
* शाळेच्या परिसरामध्ये कोणतीही अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही याची दक्षता घ्यावी.
* विद्यार्थी शाळेच्या परिसरात उपस्थित असताना त्याच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी शाळेची राहील.
* शाळा व्यवस्थापनाने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबर बैठक आयोजित करुन सुरक्षेच्या दृष्टिने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. असे या निर्णयात म्हटले आहे.
* शाळेतील मुलांच्या उपस्थिती संदर्भात सकाळी, दुपारी आणि शाळा सुटण्याच्या वेळेस संध्याकाळी हजेरी नोंदविण्यात यावी व अनुपस्थित विद्यार्थ्यांबाबत त्यांच्या पालकांना एसएमएसव्दारे कळविण्यात यावे.
न्यायालयाच्या आदेशानुसार गठित करण्यात आलेल्या समितीच्या अहवालामधील सूचना विचारात घेऊन, राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील तक्रारपेटी संदर्भात उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार शाळेमध्ये तक्रारपेटी शाळेच्या दर्शनी भागात प्रवेशव्दारानजीक, विद्यार्थ्यांच्या नजरेस येईल तसेच त्यांना त्यांच्या तक्रारी पेटीमध्ये टाकण्यास सोयीस्कर आणि सुरक्षित वाटेल, अशा पध्दतीने लावण्याची कार्यवाही करावी.
* तक्रारपेटी पुरेशा मापाची व सुरक्षित असावी. शाळेमधील तक्रारपेटी पालक-शिक्षक समितीचे अध्यक्ष व सखी सावित्री समितीचे अध्यक्ष तसेच शाळेचे मुख्याध्यापक / प्राचार्य, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती सदस्य, पालक प्रतिनिधी / विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समक्ष आठवड्यातून किमान दोन वेळा उघडण्यात यावी.
* तक्रारपेटीमध्ये प्राप्त तक्रारी व त्या अनुषंगाने करण्यात आलेली कार्यवाही याची लेखी नोंद याबाबतचा अभिलेख किमान सहा महिन्यासाठी जतन करण्यात यावा.
* गंभीर/संवेदनशील स्वरुपाच्या तक्रारींबाबत पोलीस यंत्रणांचे सहाय्य आवश्यक असल्यास तात्काळ घेण्यात यावे.
* तक्रारपेटीत प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची नोंद घेऊन तक्रार निवारण करण्याबाबत तात्काळ आवश्यक ती कार्यवाही उपाययोजना करण्यात यावी.
* ज्या तक्रारी शाळा व्यवस्थापन/प्रशासन स्तरावर निकाली काढणे शक्य आहे, त्याबाबत तात्काळ शाळा प्रशासन स्तरावर कार्यवाही करावी.
* ज्या तक्रारींसंदर्भात क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर किंवा शासन स्तरावर कार्यवाही/मार्गदर्शन अपेक्षित असेल तेथे योग्य त्या स्तरावर तक्रारीच्या प्रतीसह संदर्भ करण्यात यावा.
* तक्रारकत्यांचे नाव गुप्त राहील व तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना कोणताही त्रास होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात यावी. असेही या शासन निर्णयात म्हटले आहे.
—————————————————————–———————————–