‘8’ चित्रपटाची प्रेरणा ; केरळात वर्गरचनेत बदल

अर्धवर्तुळ बेंचने बॅक बेंचर संकल्पनाच संपवली !

0
149
Google search engine

 कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

केरळमधील शैक्षणिक क्षेत्रात एका मल्याळम चित्रपटामुळे सकारात्मक बदल घडत आहे. ‘8’ या चित्रपटातून प्रेरणा घेऊन केरळ मधील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या वर्ग रचनेत महत्त्वपूर्ण परिवर्तन केले जात आहे. या बदलाच्या केंद्रस्थानी आहे. अर्धवर्तुळाकार बेंचची नवीन संकल्पना.
परंपरागत वर्गात मागच्या बाकांवर बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘बॅक बेंचर’ म्हणून हिणवले जात असे. या संकल्पनेला शैक्षणिकदृष्ट्या दुर्लक्षित समजले जाई. मात्र, ‘8’ चित्रपटाने दाखवलेली कल्पना प्रत्यक्षात आणत केरळच्या शाळांमध्ये अशी बसण्याची रचना केली जात आहे, जिथे कोणीही मागे राहणार नाही. अर्ध किंवा पूर्ण वर्तुळाकार बसण्याची ही पद्धत शिक्षक व विद्यार्थ्यांमधील संवाद वाढवते.
या नवकल्पनेचा उद्देश म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा वर्गातील सहभाग वाढवणे, संवाद साधता यावा, आणि शिक्षणात समावेशकता यावी. मागच्या बाकांवर बसणारे जे विद्यार्थी पूर्वी दुर्लक्षित राहायचे, ते आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढतो आहे.
केरळ सरकार किंवा शाळांचे शिक्षक मंडळ यांच्याकडून अजून मोठ्या प्रमाणावर या प्रयोगाचा विस्तार अपेक्षित आहे. सध्या विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळांमध्ये हा प्रयोग अधिक सुलभपणे राबवता येत आहे.
संकल्पना संपूर्ण देशभर लागू होऊ शकते का ? 
या प्रश्नावर शिक्षणतज्ज्ञ म्हणतात की, “शाळांमध्ये जर जागेची आणि विद्यार्थ्यांच्या संख्येची अडचण नसेल, तर अर्धवर्तुळ पद्धत सहज शक्य आहे. शिक्षकांनी थोडासा पुढाकार घेतला, तर हे शक्य आहे.”
सुजाण नागरिक व पालकांनी आपल्या शाळांमध्ये या पद्धतीसाठी पाठपुरावा करावा, असे आवाहन केले जात आहे. हा प्रयोग केवळ एक शिक्षणपद्धतीचा बदल नसून, तो सामाजिक समानतेकडे एक पाऊल आहे. ‘8’ चित्रपटाने दिलेली प्रेरणा आता प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देताना दिसत आहे.

———————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here