Gokul Dudh Sangh's operations will be investigated, officers appointed; report to be submitted within fifteen days
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ( गोकुळ ) यांच्या कारभारातील अनियमिततेवर अखेर थेट चौकशी सुरू झाली आहे. सांगलीतील जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग दोनचे सदाशिव गोसावी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी १५ दिवसांत अहवाल विभागीय उपनिबंधक ( दुग्ध ) यांच्याकडे सादर करायचा आहे.
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई होत आहे. दूध उत्पादकांना वाटपासाठी घड्याळे व जाजम यांची विनानिविदा खरेदी प्रक्रिया तसेच इतर अनियमित कारभाराबाबत शंका व्यक्त करण्यात आली होती. याबाबत पवार यांनी शिष्टमंडळासह गोकुळच्या कार्यालयात भेट देत व्यवस्थापकीय संचालकांना जाब विचारला होता. त्यानंतर सहायक निबंधक ( दुग्ध, कोल्हापूर ) प्रदीप मालगावे यांच्याकडे चौकशीची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
या निवेदनाचे सादरीकरण विभागीय उपनिबंधक ( दुग्ध ) राजकुमार पाटील ( पुणे ) यांच्याकडे झाले. त्यांनी गोकुळ कडून याबाबत स्पष्टीकरण मागविले होते, जे संघाकडून सादर करण्यात आले. मात्र, तक्रारीतील मुद्दे लक्षात घेऊन दोन दिवसांपूर्वी थेट चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. याबाबतची अधिकृत माहिती आज पत्राद्वारे सर्व संबंधितांना देण्यात आली आहे.
दरम्यान, संजय पवार यांनी दुग्ध विभागाच्या या निर्णयाचे स्वागत करताना प्रतिक्रिया दिली. “माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांची कोठेही फसवणूक होऊ नये, त्यांचे घामाचे पैसे सत्तेचा दुरुपयोग करून उधळले जात आहेत. संबंधितांकडून पैसे वसूल झाले पाहिजेत आणि कायदेशीर कारवाई व्हायला हवी. तपास निपक्षपाती होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विभागीय उपनिबंधकांच्या आदेशानुसार, शिवसेनेकडून करण्यात आलेल्या तक्रारींचीच केवळ चौकशी करण्यात येणार आहे. तसेच चौकशी अहवाल स्वयंस्पष्ट असावा, असा स्पष्ट निर्देश देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत चौकशी पूर्ण करून अहवाल पुण्यातील दुग्ध विभागाकडे सुपूर्द करावा लागणार आहे. गोकुळ दूध संघाच्या कारभारातील या चौकशीच्या निष्कर्षांकडे सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.