उद्योगसमुहांनी पर्यावरण रक्षणाची धुरा स्वीकारावी : आमदार सुधीर मुनगंटीवार

‘ब्रँड ऑफ द इयर’ शिखर परिषदेत आ. मुनगंटीवार यांनी साधला संवाद..

0
104
Google search engine

मुंबई : प्रतिनिधी 

पूर्वी उद्योग समूहांसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऐच्छिक होती. आता त्यात सगळे योगदान देत आहेत. मात्र आता उद्योग समूहांनी सीएसआर अंतर्गत पर्यावरण संवर्धनाचीही जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. टीम मार्क्समेन आयोजित टाइम्स नाऊ आणि बिझनेस स्टँडर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील सहारा हॉटेल येथे “ब्रँड ऑफ द इयर २०२५” या शिखर परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शिखर परिषदेत प्रतिष्ठित ब्रँड्सच्या प्रमुखांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ‛इन फोकस’ या मॅगझीनचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर. गोपालकृष्णन (माजी कार्यकारी संचालक, टाटासन्स), प्रिधी गुप्ता (सीएमओ, एसईडब्ल्यू.एआय), ललातेंदू पांडा (सीनियर व्हीपी आणि बिझनेस हेड, जिओमार्ट) आणि वनिता केशवानी (सीईओ, मॅडिसन वर्ल्ड) आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘काळानुरूप बदल केला तर नक्कीच ब्रँड प्रस्थापित करता येतो. नवोन्मेष नेतृत्व आणि सर्वोत्तम ब्रँड्सच्या या उत्सवातून, पुरस्कार प्राप्त ब्रँड्स भारताला उद्योग क्षेत्रात निश्चितच पुढे घेऊन जातील हा विश्वास आहे.’ यावेळी त्यांनी जापानचे उदाहरण दिले. ‘जपानमध्ये एखाद्या उत्पादनाची गुणवत्ता एका टक्क्याने देखील कमी असेल तर ते उत्पादन रद्द केले जाते. शंभर टक्के उत्तम गुणवत्ता तिथे अनिवार्य आहे. त्यामुळेच जापान जगात सर्वात पुढे आहेत.’

जर्मनीचे उदाहरण देताना ते म्हणाले, ‘जर्मनीमध्ये सुई बनवणाऱ्या एका कारखान्यात एकदा एका मंत्र्यांनी भेट दिली. तेव्हा मंत्र्यांनी कुतुहलाने एक सुई हातात घेतली. तर त्या कंपनीच्या मालकाने सुईचा संपूर्ण ट्रे रिजेक्ट केला. असे करण्याचे कारण त्यांना विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘त्या सुईला तुमच्या बोटाचा घाम लागला आणि त्यामुळे ती सुई खराब झाली किंवा गंजली तर माझे सोडा माझ्या देशाचे नाव खराब होईल. त्यामुळे मी संपूर्ण ट्रे रद्द केला. एखाद्या प्रॉडक्ट बद्दल किती सतर्क असावे याचे हे उत्तम उदाहरण आहे.

महाराष्ट्र बनतेय इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन
देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आता भारताने ‘जय जवान जय किसान जय विज्ञान’ याच्यासोबत ‘ जय अनुसंधान’ असा नारा दिला आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आपण आयातीवरचे अवलंबित्व कमी करत आहोत. भारतीय अर्थव्यवस्था मोठी प्रगती करत आहे. महाराष्ट्र देखील या प्रगतीत आपले योगदान देत आहे. महाराष्ट्र ‘इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन’ बनत आहे. सरकारकडून तुम्हाला अडचणी असतील, तर तुमचा प्रतिनिधी म्हणून त्या सोडवण्याकरता मी पुढाकार घेईल, असा विश्वासही आ. श्री. मुनगंटीवार यांनी उपस्थितांना दिला.

२ टक्के सीएसआर पैकी किमान ०.२५ टक्के तरी पर्यावरण विषयासाठी खर्च व्हावेत अशी आ.मुनगंटीवार यांनी अपेक्षा व्यक्त केली. मी यासंदर्भात पंतप्रधान श्री. मोदीजींशी चर्चा करणार आहे. चांगले वातावरण, चांगले पर्यावरण आणि वायू बदल या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी तोच एक मोठा पर्याय आहे. हे सांगत भविष्यात पर्यावरणाच्या क्षेत्रात कॉर्पोरेटने मदत करावी असे, आ.मुनगंटीवार म्हणाले.

—————————————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here