बुडत आहे इंडोनेशियाची राजधानी जकार्ता — हवामान बदलाचा एक जागतिक इशारा

0
37
Google search engine

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता (Jakarta) हे जगातील सर्वाधिक गजबजलेले आणि वेगाने वाढणारे शहर आहे. हे शहर केवळ इंडोनेशियाचं राजकीय केंद्र नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेचं हृदय मानलं जातं. पण या प्रगतीच्या मागे एक भयानक सत्य दडलं आहे ते म्हणजे  जकार्ता हळूहळू समुद्रात बुडत आहे. आणि येत्या २०५० पर्यंत बुडून जाईल असे जगभरतील वैज्ञानिकांचे मत आहे.



शास्त्रज्ञांच्या मते, जकार्ता जगातील सर्वाधिक वेगाने बुडणाऱ्या शहरांपैकी एक आहे. हे संकट केवळ त्या देशासाठीच नव्हे, तर जगातील सर्व किनारी शहरांसाठी एक गंभीर इशारा ठरत आहे.

जकार्ता हे शहर जावा बेटाच्या (Java Island) उत्तर किनाऱ्यावर, जावा समुद्राच्या किनारी वसलेलं आहे. या शहराचं क्षेत्रफळ सुमारे ६६२ चौरस किलोमीटर आहे आणि लोकसंख्या जवळपास ३ कोटींच्या पुढे आहे.
हे शहर पावसाळ्यात पुरग्रस्त होतं, आणि मोठ्या प्रमाणात नदी व समुद्राच्या पाण्याने वेढलं जातं.

                         जकार्ता का बुडत आहे ?

जमिनीखालचं पाणी काढण्याचा अतिरेक (Groundwater Extraction)

जकार्तातील मोठ्या प्रमाणात लोकसंख्येला शुद्ध पाण्याचा पुरवठा सरकारकडून होत नाही. परिणामी, बहुतेक नागरिक व उद्योग जमिनीखालचं पाणी काढण्यासाठी खोल विहिरी व पंप वापरतात.
यामुळे जमिनीखालचा भाग रिकामा होतो आणि शहराची जमीन हळूहळू खाली बसू लागते.
काही भागात तर दरवर्षी २० ते २५ सेंटीमीटरपर्यंत जमीन खाली जाते.

समुद्रपातळी वाढ (Sea Level Rise)

हवामान बदलामुळे जगभरात समुद्राची पातळी वाढत आहे. जकार्ता समुद्राच्या अगदी जवळ असल्याने ही वाढ थेट शहरावर परिणाम करते.
सध्या अंदाजे ४०% जकार्ता समुद्रसपाटीखाली गेलेलं आहे.

अनियोजित शहरी विकास (Unplanned Urbanization)

लोकसंख्येच्या प्रचंड वाढीमुळे शहरात झोपडपट्ट्या, रस्ते आणि काँक्रीट संरचना वेगाने उभारल्या गेल्या.
पावसाचं पाणी जमिनीत मुरण्याऐवजी रस्त्यावर साचतं, आणि पूरस्थिती निर्माण होते.

कमकुवत ड्रेनेज आणि पायाभूत सुविधा जकार्ताची ड्रेनेज व्यवस्था जुनी आणि अपुरी आहे. पावसाळ्यात थोडा जोराचा पाऊस झाला की शहराचा मोठा भाग पाण्याखाली जातो.

या सर्वाचा सामान्य  नागरिकांच्या जीवनावर काय परिणाम होत आहे ते पाहू जकार्तातील लाखो नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात पूर, आजारपण आणि स्थलांतराचा सामना करावा लागतो.अनेक गरीब कुटुंबांची घरे वारंवार पाण्यात बुडतात. शाळा व रुग्णालये सतत पाण्यात गेल्यामुळे बंद पडतात. प्रदूषित पाणी व मलमूत्रामुळे आरोग्याचे प्रश्न वाढतात.
काही भागात लोकांना घरं उंच बांधावी लागतात किंवा कायमचं स्थलांतर करावं लागतं.

इंडोनेशियाच्या सरकारने या सर्वावर उपाय म्हणून २०१९ मध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेतला सर्वप्रथम आपली राजधानी जकार्ता हून  “नुसांतरा” या ठिकाणी स्थलांतरित करायला चालू केल आहे.

नवी राजधानी “नुसांतरा” (Nusantara) ही बोर्निओ बेटावर (East Kalimantan) उभारली जात आहे.
ही जागा भूकंप आणि समुद्रपूरांपासून सुरक्षित आहे, तसेच पर्यावरणपूरक आणि आधुनिक शहर म्हणून ती विकसित केली जात आहे. २०२४ पासून राजधानी हलवण्याचं काम सुरू झालं आहे, आणि येत्या दशकात बहुतांश सरकारी विभाग नुसांतरामध्ये स्थलांतरित होणार आहेत.

पण, जकार्तातील कोट्यवधी लोकांचं भविष्य अद्यापही धूसर आहे.

जकार्ता — जगासाठी एक इशारा आहे. 

जकार्ताचं संकट फक्त इंडोनेशियापुरतं मर्यादित नाही.
मुंबई, कोलकाता, बँकॉक, मनीला, न्यूयॉर्क, शांघाय — या सर्व किनारी शहरांनाही अशीच भीती आहे.

हवामान बदल, समुद्रपातळी वाढ, जमिनीखालचं पाणी काढण्याचा अतिरेक आणि अनियोजित विकास या सगळ्यामुळे जगभरात अनेक शहरे भविष्यात पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here