नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारत तंत्रज्ञान क्षेत्रात स्वावलंबन साधण्यासाठी मोठी पावलं टाकत आहे. सेमीकंडक्टर आणि चिप्सपासून ते स्वदेशी सॉफ्टवेअर पर्यंत विकासावर भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय आयटी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतीय वापरकर्त्यांना परदेशी सेवांऐवजी स्वदेशी झोहो (Zoho) प्लॅटफॉर्मकडे वळण्याचं आवाहन केलं आहे.
वैष्णव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर ट्विट करत झोहोचा वापर सुरू केल्याचं सांगितलं. “ डॉक्युमेंट अॅक्सेस, स्प्रेडशीट्स आणि प्रेझेंटेशनसाठी झोहो वापरा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशीच्या आवाहनात सामील व्हा,” असं ते म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अलीकडील जीएसटी बचत महोत्सवाच्या भाषणात देशवासियांना स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचं आवाहन केलं. पंतप्रधानांनी सांगितलं की, जीएसटी सुधारणा लागू झाल्यानंतर ग्राहकांना बचत होईल आणि देशी उद्योगांना चालना मिळेल.
झोहो म्हणजे काय ?
झोहो कॉर्पोरेशनची स्थापना १९९६ मध्ये श्रीधर वेम्बू आणि टोनी थॉमस यांनी केली. चेन्नई येथे मुख्यालय असलेली ही सॉफ्टवेअर-अॅज-अ-सर्व्हिस (SaaS) कंपनी असून तिचा तंत्रज्ञान विकास मोठ्या प्रमाणात तामिळनाडूच्या ग्रामीण भागातूनच होतो. अमेरिकेत नोंदणी असली तरी झोहोची ओळख ‘मेड इन इंडिया’ अशीच आहे. जगभरात झोहोचे १० कोटींहून अधिक वापरकर्ते असून सेवा १५० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहेत.
झोहोकडून मिळणाऱ्या सेवा
झोहो आपल्या Zoho Workplace आणि Zoho Office Suite अंतर्गत अनेक उत्पादकता साधने पुरवते.
-
Zoho Writer ( डॉक्युमेंट तयार व एडिट करण्यासाठी )
-
Zoho Sheet ( स्प्रेडशीट )
-
Zoho Notebook ( नोट्स तयार करण्यासाठी )
-
Zoho WorkDrive ( क्लाऊड स्टोरेज )
-
Zoho Mail ( ईमेल सेवा )
-
Zoho Meeting ( व्हिडिओ कॉन्फरन्सिंग )
-
Zoho Calendar ( कॅलेंडर व्यवस्थापन )