अलास्का : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्कामध्ये तब्बल तीन तास बैठक झाली. रशिया–युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीकडे जगाचे विशेष लक्ष लागले होते. या चर्चेतून ठोस निर्णय निघाला नाही, तरी बैठकीनंतर ट्रम्प यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे भारताकडे आशेने पाहिले जात आहे.
बैठकीनंतर ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “ रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर आम्ही लावलेले २५ टक्के अतिरिक्त सेकंडरी टॅरिफ येत्या एक-दोन आठवड्यांत हटवण्याचा निर्णय घेऊ शकतो.”
भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चं तेल आयात करतो. याच कारणावरून ट्रम्प प्रशासनाने भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती आणि त्यासाठी भारताला २७ ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली होती. त्यानंतर २८ ऑगस्ट पासून भारतीय वस्तूंवर एकूण ५० टक्के टॅरिफ लागू होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र ट्रम्प यांच्या नव्या वक्तव्यामुळे भारतासाठी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
तथापि, भारताबाबत बोलताना ट्रम्प यांनी एक धक्कादायक दावा केला. ते म्हणाले, “ मी सेकंडरी टॅरिफ मागे घेऊ शकतो, कारण भारताने रशियाकडून तेल खरेदी न करण्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे रशियाच्या हातून एक मोठा तेल खरेदीदार निसटला आहे.” यासोबतच त्यांनी चीनचा उल्लेख करताना म्हटलं की, “चीन रशियाकडून प्रचंड प्रमाणात तेल खरेदी करतो. जर चीनवर असा टॅरिफ लावला तर त्याचे परिणाम भयंकर असतील, त्यामुळे आम्ही टॅरिफ मागे घेण्याचा विचार करत आहोत.”
पण ट्रम्प यांचा हा दावा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. कारण वास्तवात भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवलेले नाही. उलट एका अहवालानुसार भारतीय सरकारी तेल रिफायनरी कंपन्या दररोज तब्बल २० लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी रशियाकडून करत आहेत. मग अशा स्थितीत ट्रम्प यांनी भारताबाबत केलेला दावा नेमका कोणत्या उद्देशाने केला, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
—————————————————————————————-