चेन्नई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारताच्या डिजिटल स्वावलंबनाच्या दिशेने झोहो कॉर्पोरेशनने आपले नवीन मेसेजिंग अॅप ‘अरट्टई’ (Arattai) लॉन्च केले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, येत्या काळात अरट्टई व्हॉट्सअॅप सारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला टक्कर देऊ शकेल.
गेल्या काही दिवसांपासून हे अॅप चर्चेत असून, अल्पावधीतच याची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, ते भारताच्या अॅप स्टोअरवर नंबर १ सोशल नेटवर्किंग ॲप बनले आहे. हे अॅप पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ असून, केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वदेशी वापरा’ आवाहनाला बळकटी देते.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याचे कौतुक करताना म्हटले, “अरट्टई हे इंस्टंट मेसेजिंग अॅप मोफत, वापरण्यास सोपे, सुरक्षित आणि ‘मेड इन इंडिया’ आहे. मी सर्वांना मित्र आणि कुटुंबासोबत जोडले राहण्यासाठी भारतात बनवलेले अॅप्स वापरण्याचे आवाहन करतो.”
‘अरट्टई’ म्हणजे काय?
‘अरट्टई’ हा शब्द तमिळ भाषेतील असून याचा अर्थ ‘चॅट करणे’ किंवा ‘गप्पा मारणे’ असा होतो. झोहोने तयार केलेले हे अॅप सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही विदेशी अॅपइतकेच उच्च दर्जाचे असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
खास फीचर्स
-
कमी डेटा वापर : लो बँडविड्थ ऑप्टिमायझेशनमुळे इंटरनेटचा कमी वापर होतो, कमी स्पीड असतानाही अॅप सहज चालतो.
-
कमी मेमरी वापर : फोनची कमी मेमरी वापरल्यामुळे जुन्या किंवा कमी कॉन्फिगरेशनच्या स्मार्टफोनवरही अॅप क्रॅश न होता चालतो.
-
अत्याधुनिक फीचर्स : टेक्स्ट आणि व्हॉईस मेसेजिंग, ऑडिओ-व्हिडिओ कॉल, ग्रुप चॅट, फोटो-व्हिडिओ-डॉक्युमेंट शेअरिंग, चॅनल, मीटिंग शेड्यूलिंग, स्टोरीज, लोकेशन शेअरिंग.
-
सुरक्षितता आणि प्रायव्हसी : वापरकर्त्यांची पूर्ण प्रायव्हसी आणि डेटा सुरक्षा यावर भर.
‘अरट्टई’ ॲप कसे डाउनलोड कराल ?
-
Apple च्या ॲप स्टोअर किंवा Google Play Store वर जा.
-
‘Arattai’ अॅप शोधा आणि डाउनलोड करा.
-
तुमचा फोन नंबर वापरून अकाउंट तयार करा.
-
नाव, डिस्प्ले पिक्चर, बायो आणि युझरनेम टाकून प्रोफाइल सेट करा.
-
तुमचा युझरनेम मित्रांसोबत शेअर करून त्यांना कनेक्ट करा.