ब्रिस्बेन : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या वूमन्स इंडिया ए टीमने अखेर विजयाचं खातं उघडलं आहे. टी-२० आय मालिकेत ३-० असा पराभव पत्करल्यानंतर भारताने एकदिवसीय मालिकेत शानदार पुनरागमन करत विजयी सुरुवात केली. १३ ऑगस्ट रोजी ब्रिस्बेन येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया वूमन्स ए टीमवर ३ विकेट्स राखून मात करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांनी चांगलाच अडथळा निर्माण केला. संपूर्ण ५० ओव्हर खेळण्याआधीच ४७.५ ओव्हरमध्ये कांगारू २१४ धावांवर सर्वबाद झाले. ऑस्ट्रेलियासाठी अनिका लिरॉयड हिने सर्वाधिक ९० चेंडूत नाबाद ९२ धावा केल्या, तर राहेल ट्रेनामन हिने ५१ धावांचं योगदान दिलं. मात्र इतर फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर अपयशी ठरले. भारतासाठी कर्णधार राधा यादव हिने ३ विकेट्स घेतल्या, तर तितास साधू आणि मिन्नू मणी यांनी प्रत्येकी २-२, तसेच शबमन एमडी शकील आणि तनुश्री सरकार यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
भारताची विजयी धावसंख्या
२१५ धावांचं आव्हान भारताने ४८ चेंडू शिल्लक ठेवत ७ विकेट्स गमावून पूर्ण केलं. यास्तिका भाटीया आणि शफाली वर्मा यांनी भारताला ७७ धावांची दमदार सलामी भागीदारी दिली. शफालीने ३१ चेंडूत ३६ धावा (५ चौकार) केल्या. त्यानंतर धारा गुजर (३१) आणि यास्तिका भाटीया (५९; ७० चेंडू, ७ चौकार) यांची ६३ धावांची भागीदारी भारताच्या विजयाचा पाया रचणारी ठरली. मधल्या फळीतील राघवी बिष्टने २५, तर कर्णधार राधा यादव हिने १९ धावा करून विजयात हातभार लावला.
टी-२० मालिकेतील पराभवानंतर एकदिवसीय मालिकेत मिळालेला हा विजय भारतीय संघासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे. आता भारत दुसऱ्या सामन्यात मालिका विजयाच्या निर्धाराने उतरणार आहे.
———————————————————————————-