कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भारतीय रेल्वेने एक नवा इतिहास घडवण्याच्या तयारीत आहे. भारतातील सर्वात खोल रेल्वे स्थानक सध्या आपल्या महाराष्ट्रात उभारलं जात आहे. जमिनीपासून तब्बल १०० फूट खोल, म्हणजेच साधारणपणे १० मजली इमारतीच्या खोलीइतकं हे रेल्वे स्थानक असणार आहे.
भारतातील सर्वात खोल रेल्वे स्टेशनचे काम पूर्ण होणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी हे रेल्वे स्थानक बांधले जात आहे. भारतातील सर्वात खोल रेल्वे स्टेशन वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) हे असणार आहे. हे रेल्वे स्थानक जमिनीपासून शंभर फूट खोल असेल. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशन हे मुंबईतील एक बुलेट ट्रेन स्टेशन आहे, ज्याचे बांधकाम वेगाने सुरू आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरवरील हे एकमेव भूमिगत रेल्वे स्टेशन आहे, जे १०० फूट खोलीवर म्हणजेच जमिनीपासून सुमारे ३२ मीटर अंतरावर बांधले जात आहे. त्याची खोली इतकी आहे की त्यात १० मजली इमारत बसू शकेल.
बुलेट ट्रेनच्या बीकेसी स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअर असे तीन मजले असतील. स्टेशनवर ६ प्लॅटफॉर्म असतील. या प्लॅटफॉर्मची लांबी अंदाजे ४१५ मीटर असेल. मुंबई ते अहमदाबाद दरम्यानच्या ५०८ किमी लांबीच्या मार्गावर ही बुलेट ट्रेन धावणार आहे. सध्या ८ तासांचा हा प्रवास बुलेट ट्रेनद्वारे फक्त ३ तासांत पूर्ण होणार आहे. या बुलेट ट्रेनचा कमाल वेग ताशी ३२० किमी असेल.
अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. २०२६ पर्यंत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी २४ पुल आणि सात बोगदे तयार केले जात आहेत. कॉरिडोरमध्ये ७ किमी लांबीचा समुद्री बोगदा देखील असणार आहे. समुद्राच्या पोटातून ही बुलेट ट्रेन धावणार आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोरवर साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, बिलिमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई अशी स्थानक असणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद मार्गावर भारतातील एकमेव स्वीकृत हायस्पीड रेल्वे प्रकल्प आहे. जपानच्या शिंकानसेन तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबई-अहमदाबाद दरम्यान हाय स्पीड रेल्वे तयार करुन उच्च फ्रिक्वेंन्सी मास ट्रान्झिट सिस्टम विकसीत करणे हे प्रकल्पाचे उद्दिष्ट्य आहे. ज्यामुळं भारतात गतिशीलता वाढेल आणि आर्थिकदृष्ट्या देखील प्रगती होईल.
देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये ६९० प्रवासी प्रवास करु शकतात. म्हणजेच एका ट्रेनमध्ये १० कोच असू शकतात. तर, एका बुलेट ट्रेनमध्ये तीन प्रकारच्या आसनक्षमता असतात. सगळ्यात महागडे तिकिट भाडे फर्स्ट क्लासचे असेल. यात एकूण १५ सीट असणार आहेत. त्याचबरोबर बिझनेस क्लास असेल त्यात ५५ प्रवासी असतील. स्टँडर्ट क्लासमध्ये ६२० प्रवासी असतील.



