नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारताने अलीकडेच पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये वापरलेल्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्रामुळे जागतिक स्तरावर खळबळ माजली आहे. या ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने जाणाऱ्या या मिसाईलने केवळ पाकिस्तानच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
भारत आणि रशिया यांच्या संयुक्त सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या अत्याधुनिक क्षेपणास्त्राने “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम ध्वस्त करत निर्णायक विजयाची भूमिका बजावली. पाकिस्तानची संरक्षण यंत्रणा ब्रह्मोस थोपवण्यात पूर्णपणे अपयशी ठरली, यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी घबराट पसरली.
या उल्लेखनीय यशानंतर जगभरात ब्रह्मोस मिसाईलच्या क्षमतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या प्रसिद्ध चीनी वृत्तपत्राने देखील ब्रह्मोसला “खूपच धोकादायक आणि अचूक मिसाईल” असे संबोधले आहे, जे या क्षेपणास्त्राच्या प्रभावीतेची साक्ष देते.
दरम्यान, तब्बल १५ देशांनी ब्रह्मोस खरेदीत रस दाखवला असून, यामध्ये फिलिपाईन्स, व्हिएतनाम, इंडोनेशिया यांसारख्या देशांनी अधिकृतरीत्या स्वारस्य दर्शवले आहे. हे सर्व देश आपले संरक्षण बळकट करण्याच्या दृष्टीने ब्रह्मोसकडे पाहत आहेत. काही देश तर अमेरिकेचे आणि चीनचे पारंपरिक विरोधक मानले जातात, ज्यामुळे ब्रह्मोसचा जागतिक सामरिक समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो.
भारतासाठी ही एक मोठी राजनैतिक आणि सामरिक कामगिरी मानली जात आहे. स्वदेशी तंत्रज्ञान आणि सामरिक भागीदारीच्या जोरावर भारत जागतिक संरक्षण क्षेत्रात आपले स्थान अधिक भक्कम करत आहे. ब्रह्मोसच्या निर्यातीमुळे भारताच्या संरक्षण उद्योगातही नवे युग सुरू झाले आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
—————————————————————————