प्रसारमाध्यम : स्पोर्टस डेस्क
जॉर्जियाच्या बटुमी शहरात पार पडत असलेल्या २०२५ FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकात भारताच्या चार महिला खेळाडूंनी उपांत्य फेरीपर्यंतचा थरारक प्रवास एकत्र गाठून एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे. हे यश इतकं विलक्षण आहे की, आजवर बुद्धिबळाच्या इतिहासात कोणत्याही देशाच्या चारही महिला खेळाडू एकाचवेळी उपांत्य फेरीत पोहोचलेल्या नव्हत्या.
ही केवळ बुद्धिबळातील एक फेरी नाही. ही आहे नव्या भारताच्या आत्मविश्वासाची चाल, महिला सशक्तीकरणाचा मूर्तिमंत पुरावा, आणि एका संपूर्ण पिढीला प्रेरणा देणारा क्षण. जॉर्जियातील बटुमी शहरात सुरू असलेल्या २०२५ FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकात भारतीय महिला बुद्धिबळपटूंनी अभूतपूर्व इतिहास घडवला आहे.
पहिल्यांदाच, एका देशाच्या चार महिला खेळाडूंनी एकाच वेळी उपांत्य फेरी गाठली आहे. याआधी ही कामगिरी कोणत्याही देशाच्या वाट्याला आलेली नव्हती. बुद्धिबळाच्या शांत पटावरून सुरू झालेली ही धग आता संपूर्ण देशभर उसळली आहे आणि तिच्या केंद्रस्थानी आहेत भारताच्या ‘चार राण्या’
कोनेरू हम्पी –
माजी वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियन. संयम, शिस्त आणि खोल डावपेच यांचं मूर्त रूप. त्यांच्या प्रत्येक चालीत एक निश्चितता असते. जणू प्रत्येक पाऊल आधीच नियोजित असतं. त्यांनी आपल्या अनुभवाचा कस कसून वापरत पुन्हा एकदा सिद्ध केलं की, त्यांना हरवणं सोपं नाही.
दिव्या देशमुख –
अवघ्या १८ व्या वर्षी, वर्ल्ड नंबर ३ झू जिनरला पराभूत करत इतिहास लिहिला. ही केवळ एक विजय नव्हता, तर एक ठिणगी होती. जिच्यातून भारतीय महिला बुद्धिबळाचं भविष्य उजळून निघालं. ती केवळ नवोदित नाही, ती नवयुगाची सुरुवात आहे.
द्रोणवल्ली हरिका –
अनुभव संपन्न, शांत, पण कमालीची लढवय्यी. ९८ चालींच्या मानसिक युद्धात त्यांनी विजय मिळवून दाखवलं की, धैर्य, स्थैर्य आणि तळमळ ही खऱ्या विजयी खेळाडूची ओळख आहे. त्यांनी बुद्धिबळातील सहनशीलतेची परिभाषाच बदलून टाकली.
आर. वैशाली –
प्रज्ञानंदची बहीण म्हणून ओळख सुरू झाली होती, पण आता ती स्वतःचं तेज निर्माण करत आहे. ब्लिट्झ फायनलमधील प्रत्येक सेकंदाच्या तणावात शांत राहून विजय मिळवणं म्हणजे खरंतर एका महाकाव्याची रचना करणेच. तिच्या खेळात आत्मविश्वास आणि धार आहे.
एकत्र आले अनुभव आणि उर्जेचे तत्त्व
कोनेरू हम्पी व द्रोणवल्ली हरिका यांसारख्या अनुभवी खेळाडूंबरोबर, दिव्या देशमुख व आर. वैशाली सारख्या नव्या दमाच्या खेळाडूंनी भारतीय संघाचं रूपच बदलून टाकलं आहे. ‘जिथे अनुभवाला नवे आत्मविश्वासाचे पंख लाभतात, तिथे इतिहास घडतो’ हे त्यांनी जगाला दाखवून दिलं.
बुद्धिबळ हा शांत खेळ असला तरी, त्यात घडणाऱ्या प्रत्येक चाली मागे प्रचंड तयारी, मानसिक ताकद आणि कलात्मक बुद्धिमत्ता असते. या चारही राण्यांनी आज ही कला जगासमोर ठेवली आहे. आज, त्या केवळ बुद्धिबळाच्या पटावर नाही, तर संपूर्ण भारताच्या हृदयात राज्य करत आहेत. ही सुरुवात आहे. एका नवयुगाची. जिथे मुली फक्त खेळत नाहीत… त्या इतिहास घडवतात.
—————————————————————————————–