कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
अवकाशातील गूढ गोष्टी जसे की ग्रह, तारे, आकाशगंगा आणि अगदी ‘ब्लॅकहोल’ यांसारख्या गुंतागुंतीच्या संकल्पना आता वैज्ञानिक संशोधनांमुळे सामान्य लोकांपर्यंत सहज पोहोचत आहेत. अशाच एका असामान्य आणि थरारक संकल्पनेवर काम करत असलेल्या गुवाहाटी येथील आयआयटी (भारतीय प्राद्योगिकी संस्था) मधील संशोधकांनी महत्त्वाचे निष्कर्ष समोर आणले आहेत. अवकाशात असणारे ग्रह, तारे, आकाशगंगा इतकंच काय तर अगदी ब्लॅकहोल यांसारख्या संकल्पनांनासुद्धा संशोधकांनी अगदी सोप्या रितीनं सामान्यांपर्यंत आणलं आहे.
ब्लॅकहोल बाबत संशोधकांनी महत्त्वाचे निष्कर्ष मिळवले आहेत. इस्रोच्या युआर राव सॅटेलाईट सेंटर आणि इस्रायलच्या हायफा विश्वविद्यालयाच्या संयुक्त प्रयत्नांनी एका ब्लॅकहोलमधून उत्सर्जित होणाऱ्या ‘एक्स रे सिग्नल पॅटर्न’ला डिकोड करण्यात आलं आहे. ब्लॅकहोल जीआरएस 1915+105 याचं मूळ अंतर पृथ्वीपासून २८ हजार प्रकाशवर्षे दूर असल्याचं या निरीक्षणातून सांगण्यात आलं.
या संशोधनाद्वारे त्यांनी अंतराळातील एका गुंतागुंतीच्या संकल्पनेवर प्रकाश टाकला आहे, ज्यामुळे अवकाशातील हालचाली, उच्च ऊर्जा असलेली किरणं आणि विशाल अंतराळ घटना यांचा अभ्यास अधिक सखोलपणे करता येणार आहे. हे निष्कर्ष केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाहीत, तर भविष्यातील अंतराळ संशोधनासाठीही उपयुक्त ठरणारे आहेत.
जगभरातील संशोधकांकडून ब्लॅकहोलसंदर्भातील माहितीवर अध्ययन सुरू असून त्यातू बऱ्याचदा काही अनपेक्षित स्वरुपातील माहिती समोर येताना दिसते. जेव्हा ब्लॅकहोल विविध ताऱ्यांच्या बाह्य थरांमधून वायू शोषतात तेव्हा ते अधिक उष्मा आणि एक्स रे अर्थात क्ष किरणं उत्सर्जित करतात. याच क्ष किरणांच्या माध्यमातून संशोधकांना ब्लॅकहोल आणि त्याच्या आजुबाजूला असणाऱ्या वातावरणाची माहिती मिळण्यास मदत होत आहे. आयआयटी गुवाहाटीच्या भौतिकशास्त्र विभागाशी संलग्न संशोधक आणि अध्ययनकर्त्यांच्या माहितीनुसार या निरीक्षणादरम्यान या एक्सरेमुळं बरीच माहिती समोर आली आहे.
संशोधनकर्त्यांनुसार ज्या ब्लॅकहोलचं निरीक्षण करण्यात आलं, त्यातून निघणारा उजेड दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये बदलताना दिसला. ज्यपैकी एक स्त्रोत अतिशय चकाकणारा आणि दुसरा मंद प्रकाशाच चमकणारा होता. ज्यावेळी हे स्त्रोत चकाकण्याच्या टप्प्यात असतात आणि त्यांचा झगमगाट अधिक असतो तेव्हा कोरोना (ब्लॅकहोलच्या नजीक असणारा वायूंचा थर) अतिशय उष्ण असतो.
उलटपक्षी जेव्हा मंद टप्पा सक्रिय होतो तेव्हा हा कोरोना थंड होण्यास सुरुवात होते आणि त्यामुळं झगमगाटसुद्धा दिसेनासा होतो. ही प्रक्रिया स्पष्ट सांगू पाहते की, हे इशारे संभवत: कोरोनातूनच उत्पन्न होत आहेत. जिथं प्रत्येक टप्पा काही ‘शे’ सेकंद सुरू राहिला आणि नियमित स्वरुपात या प्रक्रियेची पुनरावृत्ती झाली.
या शोधामुळे केवळ वैज्ञानिक समुदायच नव्हे तर सामान्य लोकांचाही आकाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो, असं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
——————————————————————————————–