पुणे भरती कार्यालया अंतर्गत कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच गोवा राज्यातील नवयुवकांसाठी भारतीय सैन्य दलामध्ये अग्निवीर सैन्य भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया २५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्हा क्रीडा मैदान, सातारा येथे पार पडणार आहे.
भरतीची संधी मिळणाऱ्या सर्व पात्र युवकांनी या प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे.
भारतीय सैन्य दलामध्ये ‘अग्निवीर’ या योजनेद्वारे युवकांना देशसेवेची संधी उपलब्ध होत आहे. या भरतीत सहभागी होण्यासाठी युवकांनी शारीरिक चाचणी, वैद्यकीय तपासणी आणि लेखी परीक्षा या टप्प्यांतून यशस्वी होणे आवश्यक आहे.
भरतीसंबंधी सर्व आवश्यक माहिती, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे तसेच नोंदणी प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय व भरती कार्यालयामध्ये प्रत्यक्ष चौकशी करूनही माहिती मिळविता येणार आहे, असे डॉ. चवदार यांनी पत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे.
या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून मराठी व कोकणी युवकांना भारतीय सैन्य दलात भरारी घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, जिल्ह्यातील युवकांनी याचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.