प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
आपण ज्याला पंचांग म्हणतो, ते फलज्योतिष नसून शुद्ध खगोलीय गणित आहे. पंचांग ज्या ग्रंथांच्या आधारे तयार केले जाते, त्या ग्रंथांना करण ग्रंथ असे म्हणतात. भारतामध्ये पंचांगांचा वापर हजारो वर्षांपासून होत आलेला आहे. पंचांग म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही पाच अंगे. या पाच अंगांविषयी माहिती ज्या ग्रंथात असते, त्याला पंचांग म्हणतात. पंचांग एकदम पूर्ण स्वरूपात निर्माण झाले नाही. सुरुवातीला एक अंग, मग द्विअंग, त्रिअंग, चतुरंग आणि पुढे पंचांग अशी त्याची उत्क्रांती झाली.
तिथीची माहिती इसवीसनपूर्व १५०० काळापासून भारतात होती. वार म्हणजे रविवार, सोमवार इत्यादी इसवीसनपूर्व १००० पासून वापरात आहेत. नक्षत्रांची माहिती इसवीसनपूर्व १५०० काळापासून होती, तर योगांचा वापर इसवीसन ७०० नंतर सुरू झाला. करणांची माहितीही इसवीसनपूर्व काळातील आहे. हा सर्व पंचांगाचा इतिहास आहे.
पंचांग कशासाठी असते, याचा विचार केला तर सण-उत्सव हे शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी असतात. प्राचीन ऋषीमुनींनी याचा सखोल विचार केलेला होता. शरीराचे आरोग्य मुख्यतः आहारावर अवलंबून असते आणि आहार ऋतूप्रमाणे असला पाहिजे. ऋतुबदलाच्या काळात आजारांचे प्रमाण वाढते, हे आजही आपण अनुभवतो.म्हणूनच लोकांनी ऋतूप्रमाणे आहार घ्यावा, यासाठी सण-उत्सवांची रचना ऋतूंवर आधारित केली आहे. सण तिथीवर, म्हणजे चंद्रावर अवलंबून असतात, तर ऋतू सूर्याच्या गतीवर आधारित असतात. म्हणून भारतात पंचांगामध्ये चांद्र-सौर पद्धतीचा सुंदर मेळ घातलेला आहे.
उदाहरणार्थ, श्रावण महिन्यात पावसामुळे हालचाल कमी होते, पचनशक्ती मंदावते, त्यामुळे हलका आहार आवश्यक असतो. म्हणून श्रावणात उपवासाची संकल्पना आली. पूर्वी या काळात धान्याची टंचाईही असायची, त्यामुळे उपवासाने धान्याची बचत होत असे. लोकांना उपवासाचे महत्त्व पटावे म्हणून त्याला पुण्याची संकल्पना जोडली गेली.
हिवाळ्यात भूक अधिक लागते आणि शरीराला तेल-तुपाची गरज असते. म्हणून दिवाळी, मकर संक्रांतीसारखे सण थंडीच्या काळात येतात. मकर संक्रांतीला तीळ आणि तिळाच्या तेलाचा उपयोग करण्यामागेही हाच शास्त्रीय विचार आहे.
नियम असा आहे की सूर्य मीन राशीत असताना जो चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो, त्याला चैत्र म्हणतात आणि सूर्य मेष राशीत असताना सुरू होणाऱ्या चांद्र महिन्याला वैशाख म्हणतात. कधी कधी एका सूर्यराशीत दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो. तेव्हा पहिला अधिक महिना आणि दुसरा निज महिना असतो. या अधिक महिन्याला इंग्रजीत Intercalary Month म्हणतात.
पंचांगाचा पहिला करण ग्रंथ म्हणजे वेदांग ज्योतिष. ऋग्वेद संहितेत ३६ आणि यजुर्वेद संहितेत ४४ श्लोक असून त्यामध्ये खगोलीय गणित सांगितलेले आहे. त्या काळात भारतीयांना उत्तरायण-दक्षिणायणाची अचूक माहिती होती. तेव्हा चांद्र महिन्यांना चैत्र-वैशाख अशी नावे नव्हती, तर मधू, माधव अशी नावे होती. वसंतसंपात बिंदू पूर्वी कृतिके नक्षत्रात होता, तो आज उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात आहे. यावरून कालगणनेतील अचूक निरीक्षणे लक्षात येतात. इसवीसनपूर्व काळातही भारतीय पंचांगकर्त्यांनी चांद्र-सौर पद्धतीचा मेळ घातलेला होता, हे विशेष महत्त्वाचे आहे.
यानंतर सूर्यसिद्धांत हा करण ग्रंथ निर्माण झाला. लाट नावाच्या ग्रहस्थानी हा ग्रंथ तयार झाला आणि सुमारे हजार वर्षे भारतात पंचांग त्यावर आधारित होती. त्या काळात इतर देशांमध्ये कालगणनेची माहिती नव्हती, पण भारतात अत्यंत शास्त्रीय पद्धतीने पंचांग तयार केली जात होती.
इसवीसन १५२० च्या सुमारास गणेश दैवज्ञ यांनी पंचांग आणि प्रत्यक्ष आकाशातील ग्रहस्थितीत फरक आढळल्याने ग्रहलाघव हा ग्रंथ लिहिला. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पंचांगकर्त्यांनी हा ग्रंथ मुखोद्गत केला आणि त्यावरून पंचांग तयार होऊ लागली.
पूर्वी पंचांग हस्तलिखित स्वरूपात असत. गावोगावी जोशी करण ग्रंथांच्या आधारे पंचांग तयार करून ग्रहण, संक्रांती, सण यांची माहिती लोकांना देत. १६ मार्च १८४१ रोजी गणपत कृष्णाजी पाटील यांनी पहिले छापील पंचांग प्रसिद्ध केले.
१९२० च्या सुमारास पुन्हा पंचांग आणि प्रत्यक्ष आकाशातील स्थितीत फरक दिसू लागला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी द्रिक गणितावर आधारित पंचांगाचा आग्रह धरला. १९०४ झालेल्या परिषदेत मान्यता मिळाली नाही नंतर १९१७ ला पुणे परिषद भरवली तिथे हि मान्यता मिळाली नाही आणि अखेरीस १९२० मध्ये सांगली येथे शंकराचार्य अध्यक्ष असताना झालेल्या परिषदेत द्रिक गणित स्वीकारले गेले.
लोकमान्य टिळकांनी नवीन सुधारित ग्रंथासाठी बक्षीस जाहीर केले. त्यानुसार नागपूरचे डॉ. केशव लक्ष्मण दप्तरी यांनी करणकल्पता हा ग्रंथ लिहिला. त्यावर आधारित द्रिक पंचांग तयार होऊ लागली. हा ग्रंथ मराठी आणि संस्कृतमध्ये प्रसिद्ध झाला आणि पाश्चिमात्य विद्वानांनीही त्याचा अभ्यास केला.
आज पंचांग संगणकाच्या सहाय्याने तयार केली जातात, त्यामुळे खगोलीय गतीतील सूक्ष्म बदलही अचूकपणे समाविष्ट होतात. त्यामुळे आजची पंचांग पूर्णपणे द्रिक गणितावर आधारित आहेत.
याचे श्रेय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गणेश दैवज्ञ यांना नक्कीच द्यायला हवे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज आपल्याला ऋतू आणि ग्रहगोलांवर आधारित अचूक पंचांग उपलब्ध आहेत.
पंचांग म्हणजे फलज्योतिष नव्हे.
पंचांग म्हणजे खगोलीय गणित आहे.
जसे आकाशात आहे, तसेच पंचांगात असते
आणि जसे पंचांगात आहे, तसेच आकाशात दिसते.
सण-उत्सव ऋतूंवर आधारित असल्याने त्यांचा योग्य उपयोग करून आपले जीवन आरोग्यपूर्ण, सुखी आणि आनंदी करणे, हेच खरे जीवनाचे सार्थक आहे.






