नवी दिल्ली : प्रसारमाध्यम न्यूज
चीनमध्ये झालेल्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. तामिळनाडूमधील आनंदकुमार वेलकुमार यांनी वरिष्ठ पुरुषांच्या एक हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत भारताचे पहिले सुवर्णपदक मिळवले.
स्पर्धेतील तगड्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये आनंदकुमार यांनी आपल्या वेगवान आणि अचूक खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अंतिम फेरीत त्यांनी एक हजार मीटर अंतर अगदी कमी वेळेत पूर्ण करत आंतरराष्ट्रीय स्पर्धकांना मागे टाकले आणि भारतासाठी ऐतिहासिक विजयाची नोंद केली.चेन्नईतील गिंडी येथील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय आनंदकुमार वेलकुमारने १: २४. ९२४ सेकंदाच्या वेळेसह चॅम्पियशिपमध्ये भारताचे पहिले सुर्वणपदक जिंकले आणि स्पीड स्केटिंग रेसमध्ये तो पहिला भारतीय विश्वविजेताही बनला.
चीनमधील बेदाईहे येथे झालेल्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियशिपमध्ये ५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत आनंदकुमार वेलकुमारने ४३.०७२ सेकंद वेळ नोंदवून भारताचे पहिले वरिष्ठ जागतिक पदक जिंकले होते. या स्पर्धेत आनंदकुमार वेलकुमारने ५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा विजय मिळाला.
पंत्रप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर पोस्ट करून आनंदकुमार वेलकुमारचे कौतुक केले. मोदी म्हणाले की, ‘२०२५ च्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियशिपमध्ये वरिष्ठ पुरुषांच्या १००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुर्वणपदक जिंकल्यामुळे, आनंदकुमार वेलकुमारचा अभिमान आहे. जिद्द, चिकाटी, वेग आणि परिश्रमामुळे स्पीड स्केटिंग रेसमध्ये आनंदकुमार वेलकुमार भारताचा पहिला जागतिक विजेता बनला आहे. आजच्या युवापिढीसाठी त्याची कार्यकिर्द अतिशय प्रेरणादायी आहे. आनंदकुमार वेलकुमारच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
आनंदकुमारच्या या यशामुळे भारताच्या स्पीड स्केटिंग क्षेत्रात नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे. भारताने या खेळात जागतिक स्तरावर आपले नाव उंचावले असून, देशभरातून आनंदकुमारवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खेळ आणि युवा मंत्रालय, तसेच भारतीय स्केटिंग महासंघ यांनीही त्याचे विशेष कौतुक केले असून, येत्या काळात स्पीड स्केटिंगमध्ये अधिक गुंतवणूक आणि प्रशिक्षणासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे संकेत दिले आहेत.
————————————————————————-