नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारताच्या ऑटोमोबाईल आणि वाहतूक क्षेत्रात होत असलेल्या क्रांतिकारी बदलांचा मोठा पट उलगडला आहे. एका कार्यक्रमात त्यांनी पर्यायी इंधन, सॉफ्टवेअर-आधारित वाहने, हरित हायड्रोजन, रस्ते सुरक्षा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या विविध मुद्द्यांवर सविस्तर माहिती दिली आहे.
ऑटो उद्योगात झपाट्याने प्रगती
गडकरी म्हणाले, “ भारताचा ऑटोमोबाईल उद्योग २२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून तो ४ कोटी लोकांना रोजगार देतो. आता तो जपानलाही मागे टाकत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा उद्योग बनला आहे. येत्या काळात भारत हा जगातील अग्रगण्य ऑटोमोबाईल हब बनेल, याची खात्री आहे.”
पर्यायी इंधनांकडे वाटचाल
गडकरींनी स्पष्ट केले की, भारत पेट्रोल-डिझेल वरून पर्यायी इंधनांकडे वळतोय. “ इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, एलएनजी, सीएनजी आणि ग्रीन हायड्रोजन हे भारताच्या ऊर्जा भविष्यातील मुख्य घटक असतील. बजाज, टीव्हीएस, होंडा यांसारख्या कंपन्या आज त्यांच्या दुचाकींपैकी ५०% निर्यात करत आहेत,” असे ते म्हणाले.
२०३० पर्यंत ५ दशलक्ष टन हायड्रोजन
गडकरींनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचा उल्लेख करत सांगितले की, “ २०३० पर्यंत ५ दशलक्ष मेट्रिक टन हायड्रोजन तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे इंधन आयात खर्चात १ लाख कोटींची बचत होईल आणि सुमारे ६ लाख नव्या रोजगार संधी निर्माण होतील.”
टाटा, रिलायन्स, आयओसीएल, अशोक लेलँड या कंपन्यांनी हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रकची चाचणी सुरू केली आहे.
वाहतूक आणि रस्ते सुरक्षेचा महाप्लान
गडकरींनी रस्ते सुरक्षा हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. “४० हजार कोटींचा खर्च करून NCAP, ABS आणि ब्लॅक स्पॉट्स दूर करण्याचे काम सुरू आहे. ‘झिरो फॅटॅलिटी कॉरिडॉर’ आणि २२ भाषांमधील जागरूकता मोहीमही राबवली जाते आहे.”
त्याचबरोबर, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे रस्त्यांचे निरीक्षण सुरू करण्यात येणार आहे.
मास मोबिलिटी क्रांती
“मास मोबिलिटी म्हणजेच मोठ्या प्रमाणावर लोकांना सुरक्षित, सोयीस्कर वाहतूक उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे,” असे गडकरी म्हणाले. राष्ट्रीय महामार्गांच्या लांबीत प्रचंड वाढ झाली आहे:
-
२०१४ मध्ये : ९१,२८७ किमी
-
२०२५ मध्ये : १,४६,२०४ किमी
-
हाय-स्पीड कॉरिडॉर : ९३ किमी वरून २,४७४ किमी
दररोज १०० किमी महामार्ग बांधले जात आहेत. २५,००० किमी दुपदरी रस्त्यांचे चारपदरी रूपांतर सुरू आहे.
पर्यावरणपूरक वाहतूक दृष्टिकोन
-
महामार्गालगत २०-२५ कोटी झाडं लावण्याचा प्रस्ताव
-
पर्यावरण मंत्रालय ‘ट्री बँक योजना’ राबवण्याच्या विचारात
शहरी वाहतुकीचा नवीन चेहरा
दिल्ली, बेंगळुरू सारख्या महानगरांमध्ये पुढील नवकल्पना :
-
मेट्रोनियो पॉड टॅक्सी
-
हायपरलूप ट्रान्सपोर्ट
-
एलिव्हेटेड पिलर नेटवर्क
-
केबल-रन इलेक्ट्रिक बसेस
-
रॅपिड इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्ट
डोंगराळ भागांसाठी विशेष वाहतूक योजना
डोंगराळ आणि दुर्गम भागांमध्ये:
-
३६० रोपवे आणि फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्प
-
त्यातील ६० प्रकल्प सुरू
-
केदारनाथसारख्या तीर्थक्षेत्रांचा समावेश
या प्रकल्पांचा उद्देश म्हणजे सुरक्षित, वेगवान आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सोय उपलब्ध करून देणे.
नितीन गडकरी यांनी मांडलेला आराखडा केवळ वाहन तंत्रज्ञानापुरता मर्यादित नाही, तर तो एक एकात्मिक पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्टीकोन अधोरेखित करतो. सॉफ्टवेअर-आधारित वाहने, हरित इंधन, स्मार्ट शहरांची वाहतूक व्यवस्था, आणि प्रगत रस्ते संरचना यांमुळे भारताला जागतिक गतिशीलतेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.
———————————————————————————