नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारताच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. स्वदेशी हलक्या लढाऊ विमान ‘ तेजस ’ ( Tejas ) साठी अमेरिकेच्या ‘ जीई ’ ( GE ) कंपनीसोबत तब्बल १ अब्ज डॉलरचा करार करण्यात येत आहे. या करारानुसार भारताला ११३ अतिरिक्त ‘जीई-४०४’ (GE-४०४) इंजिनचा पुरवठा केला जाणार आहे. हा करार सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून, यामुळे स्वदेशी संरक्षण उत्पादनाला मोठी चालना मिळणार आहे.
सध्या ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (HAL) ने भारतीय हवाई दलाच्या पहिल्या ८३ ‘एलसीए मार्क 1ए’ लढाऊ विमानांसाठी ‘जीई’ सोबत ९९ इंजिनचा करार केला आहे. नवीन ११३ इंजिनांच्या करारामुळे ‘एचएएल’कडे एकूण २१२ इंजिनांची उपलब्धता राहणार आहे. ‘जीई’ दरमहा दोन इंजिनांचा पुरवठा करेल, ज्यामुळे भारतीय कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही.
दुसरा मोठा करार
हा करार अमेरिकेसोबतचा दुसरा मोठा संरक्षण करार मानला जात आहे. यापूर्वीच ६२,००० कोटी रुपयांचा ९७ ‘एलसीए मार्क १ ए’ लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार झाला होता. अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अलीकडेच भारतावर आयात शुल्क लादल्यानंतरही हा करार निश्चित होणे महत्त्वाचे मानले जात आहे.
भविष्यातील गरज आणि तंत्रज्ञान हस्तांतरण
भारत आपल्या ‘एलसीए मार्क २’ आणि ‘अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (AMCA) साठी २०० ‘जीई-४१४’ इंजिनांची आवश्यकता भासणार आहे. यासाठीही ‘एचएएल’ आणि ‘जीई’ यांच्यात सुमारे ८० % तंत्रज्ञान हस्तांतरणासह महत्त्वाचा करार होण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा करार पूर्ण झाल्यास भारताला प्रगत फायटर जेट इंजिन तंत्रज्ञानाचा लाभ होईल आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला गती मिळेल.
‘ मिग-२१’ चा पर्याय आणि स्वदेशी इंजिन प्रकल्प
‘तेजस’ लढाऊ विमानांचा समावेश भारतीय हवाई दलातील जुन्या ‘मिग-२१’ विमानांना बदलण्यासाठी केला जात आहे. ‘एचएएल’ने पहिल्या ८३ विमानांचा पुरवठा २०२९-३० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, तर पुढील ९७ विमानांचा पुरवठा २०३३-३४ पर्यंत करण्याची योजना आहे. याशिवाय, भारत स्वतःचे फायटर एअरक्राफ्ट इंजिन तयार करण्याच्या दिशेनेही प्रयत्नशील असून, त्यासाठी फ्रान्सच्या ‘सफ्रान’ (Safran) कंपनीसोबत सहकार्य सुरू आहे.
या करारामुळे भारतीय हवाई दलाच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होणार असून, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे भारताने टाकलेले हे पाऊल ऐतिहासिक मानले जात आहे.
———————————————————————————————-