मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
गेल्या अनेक वर्षांपासून इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून डिझेल खरेदी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ( एसटी ) अखेर डिझेल दरात वाढीव सवलत मिळाली आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही ऐतिहासिक सवलत मिळवण्यात यश आले आहे.
सध्या एसटी महामंडळ दररोज सरासरी १० कोटी ७८ लाख लिटर डिझेल या कंपन्यांकडून खरेदी करते. एसटीचे २५१ आगार ही इंधन वितरणाची केंद्रे असून, त्याच्या माध्यमातून हा पुरवठा होत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून काही प्रमाणात सवलत मिळत होती, मात्र त्यामध्ये कोणताही बदल झाला नव्हता.
मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तीन-चार वेळा बैठकांचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर डिझेल पुरवठा करणाऱ्या खाजगी कंपन्यांशीही वाटाघाटी करण्यात आल्या. स्पर्धात्मक दर मिळवण्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रियाही राबवण्याची तयारी दाखवण्यात आली.
या सर्व प्रयत्नांमुळे संबंधित कंपन्यांनी मtळ सवलतीत प्रति लिटर ३० पैसे वाढ करण्यास मान्यता दिली आहे. ही सुधारित सवलत १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळाला वर्षाकाठी सुमारे १२ कोटी रुपयांची अतिरिक्त बचत होणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. अशा परिस्थितीत जिथे शक्य आहे तिथे बचत आणि काटकसर केली पाहिजे. तिकीट विक्रीशिवाय इतर उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणेही आवश्यक आहे. या दोन्ही प्रयत्नांमुळे एसटी महामंडळ भविष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल,” असा विश्वास व्यक्त केला.
डिझेल दरात मिळालेली ही वाढीव सवलत ही एसटी महामंडळाच्या आर्थिक पुनरुज्जीवनासाठी एक सकारात्मक पाऊल ठरत आहे. मंत्री सरनाईक यांच्या प्रयत्नातून मिळालेली ही सवलत ही केवळ एक सवलत नसून, महामंडळाच्या शाश्वततेसाठी एक आर्थिक दिलासा आहे, असे मत परिवहन क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
———————————————————————————