शाहूवाडी : प्रतिनिधी
गतसालच्या तुलनेत पावसाने यावर्षी मे महिन्यापासूनच जोरदार सुरुवात केल्यामुळे ओढे, नाले खळखळून वाहू लागले आहेत. त्यामुळे शाहुवाडी तालुक्यातील विहीरी, लहान मोठे तलाव व धरणेही अगदी तुडूंब भरली आहेत. शाहुवाडी तालुक्यात गेले पंधरा दिवसांपासून अतिवृष्टी सारखा पाऊस सुरु असल्यामुळे तालुक्यातील वारणा, कडवी, कासारी, शाळी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसत आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला वरदान ठरलेल्या चांदोली धरण क्षेत्रात आज पर्यंत १२५३ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. गतसाली याच महिन्यात ७९७ मिलीमिटर पावसाची नोंद झाली होती. चांदोली धरण क्षेत्रात आतापर्यंत १० ते १२ वेळा अतिवृष्टी झाली असून धरण ७८ टक्के भरले आहे. धरणाची पाणी पातळी स्थिर राखण्याकरीता धरणाच्या मुख्य दरवाजातून नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्यामुळे मानोली व पालेश्वर धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून काही ठिकाणी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे प्रशासनाच्या वतीने नदी काढच्या गावांना व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
————————————————————————————