कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी गणेशोत्सवाच्या तोंडावर मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील अग्रगण्य गोकुळ दूध संघाने दूध खरेदी दरात वाढ जाहीर केली आहे. गोकुळच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या घरात उत्सवाचा गोडवा अधिक वाढणार आहे.
गोकुळ दूध संघाने म्हैस आणि गाईच्या दूध खरेदी दरामध्ये प्रतिलीटर १ रुपयांची वाढ केली आहे.
दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा देण्याच्या हेतूने संघाशी संलग्न म्हैस व गाय दूध उत्पादकांना दूध संकलन वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये प्रतिलिटर १ रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून दि.०१/०९/२०२५ इ. रोजी पासून जिल्ह्यातील म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रुपये ५०.५० वरून रूपये ५१.५० करण्यात आला आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रूपये ५४.८० वरून रूपये ५५.८० करण्यात आला आहे. गाय दुधामध्ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर गाय दूध खरेदी दर ३२.०० रूपये वरून ३३.०० रूपये करण्यात आला आहे. या दर वाढीमुळे गोकुळच्या म्हैस व गाय दूध उत्पादकांना महिन्याकाठी जवळ-जवळ साडे चार ते पाच कोटीचा जादाचा दर मिळणार आहे. सद्यस्थितीत गोकुळ दुधाच्या विक्री दरामध्ये कोणतेही वाढ करण्यात आलेली नाही.
संस्था इमारत अनुदान वाढ
प्राथमिक दूध संस्था संघाचा आधारभूत घटक असून सध्या इमारत बांधकामासाठी लागणारे साहित्य दर आणि मजुरांचे पगार वाढलेले आहेत व सध्याच्या महागाईचा विचार करता संस्थांना इमारत बांधणेसाठी किंवा खरेदी करणेसाठी आर्थिक अडचण निर्माण होत असल्याने सध्याच्या देणेत येणाऱ्या अनुदानामध्ये
वाढ करणेत यावी अशी संस्थांच्याकडून वारंवार मागणी होत होती. यानुसार दूध संस्थेच्या संकलनानुसार अनुदानात रक्कमेत ८ ते १० हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दूध संस्था कर्मचारी प्रोत्साहन वाढ
संस्था कर्मचारी हे दूध उत्पादक व संस्था यांच्यामध्ये दुवा असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राथमिक दूध संस्थाच्या कर्मचाऱ्याच्या पगारासाठी प्रोत्साहनपर जादा दर प्रतिलिटर ५ पैशाची वाढ करण्यात येणार असून ती प्रतिलिटर ०.६५ पैसे ऐवजी ०.७० पैसे करण्यात आली आहे. याचा जवळ-जवळ ३ कोटी रुपये वार्षिक आर्थिक भार संघावरती पडणार आहे.
मुक्त गोठा अनुदान योजना सुधारणा
गोकुळ दूध संघाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या मुक्त गोठा अनुदान योजनेत यापूर्वी किमान ५ जनावरांपर्यंत असणाऱ्या गोठ्यांनाच अनुदान दिले जात होते. ती अट शिथिल करून लहान दूध उत्पादकांनाही या योजनेचा लाभ मिळावा म्हणून किमान ५ ऐवजी ४ जनावरे असलेल्या मुक्त गोठ्याला अनुदान दिले जाणार आहे.
शेतकऱ्यांना कसा फायदा ?
ही दरवाढ लहान दिसली तरी मोठ्या प्रमाणावर दूध देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा आर्थिक दिलासा आहे. दररोज शेकडो लिटर दूध विकणाऱ्या शेतकऱ्यांना महिन्याला हजारोंचा फायदा होणार आहे. सध्या पशुखाद्याचे दर, चाऱ्याचा तुटवडा, पशुवैद्यकीय खर्च या सर्वामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच सणासुदीच्या काळात मिळालेली ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.
गोकुळचा निर्णय का महत्त्वाचा ?
कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, कराड, रत्नागिरी या भागांसह मुंबईतही गोकुळ दूध संघाचा व्यापक प्रभाव आहे. लाखो शेतकरी गोकुळशी जोडलेले आहेत. अशा परिस्थितीत गोकुळने घेतलेला हा निर्णय राज्यातील इतर दूध संघांवरही दबाव टाकणारा ठरणार आहे.
शेतकऱ्यांनी गोकुळच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, ” दरात सातत्याने वाढ व्हावी, उत्पादन खर्चाच्या तुलनेत स्थिर दर मिळावेत,” अशी मागणी शेतकरी संघटनांकडून पुढे येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात गोकुळकडून आलेलं हे ‘गिफ्ट’ शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणार आहे, यात शंका नाही.
—————————————————————————————————-