नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
देशभरातील कोट्यवधी ग्राहक असलेल्या एअरटेल कडून पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅन महागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाल विट्टल यांनी पहिल्या तिमाहीच्या निकालांवर भाष्य करताना याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.
गोपाल विट्टल यांनी सांगितले की, ” भारतातील रिचार्जची किंमत रचना विसंगत आहे. कमी रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात डेटा, कॉलिंग आणि मेसेजिंग सेवा मिळतात, त्यामुळे ते महागडा प्लॅन खरेदी करत नाहीत. अशा परिस्थितीत श्रीमंत लोक कमी पैसे देऊन फायदा घेत आहेत, तर गरीब ग्राहकांना ऐपतीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत. आम्हाला आता गरिबांकडून शुल्क आकारण्याची गरज नाही,” असे ते म्हणाले. या वक्तव्याचा अर्थ आगामी काळात काही रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढू शकतात.
एअरटेलच्या महसुलाबाबत त्यांनी सांगितले की, भारतात इंडोनेशिया सारखे प्राईस मॉडेल असते तर प्रति ग्राहक सरासरी महसूल (ARPU) आणखी वाढला असता. सध्या कंपनीचा ARPU जून २०२५ मध्ये २५० रुपयांपर्यंत पोहोचला असून तो गेल्या वर्षीच्या २११ रुपयांच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवतो. त्याचबरोबर ग्राहकांचा मोबाइल डेटा वापरही १३.४ % ने वाढून प्रति महिना २६.९ जीबी झाला आहे.
गेल्या वर्षी जुलै मध्ये एअरटेल सह इतर खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज दर वाढवले होते, ज्यामुळे अनेक ग्राहकांनी बीएसएनएल सारख्या सरकारी सेवांकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. तरी सुद्धा भारतातील डेटा प्लॅन अजूनही बऱ्याच देशांच्या तुलनेत स्वस्त आहेत आणि भारतीय ग्राहक इतर देशांच्या तुलनेत अधिक इंटरनेट वापरत असल्याचेही समोर आले आहे.
यापूर्वी व्होडाफोन-आयडियाचे सीईओ अक्षय मुंद्रा यांनी ही टेलिकॉम क्षेत्रात दरवाढीची गरज असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे येत्या काही महिन्यांत खाजगी टेलिकॉम सेवांचे रिचार्ज दर पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
————————————————————————————————-



