कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
नांदणी मठातील माधुरी ( महादेवी ) हत्तीणीला गुजरात मधील वनतारा रेस्क्यू सेंटर मध्ये हलवण्याच्या निर्णयामुळे उसळलेल्या संतापानंतर आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. नांदणी मठाचे प्रमुख जिनसेन भट्टारक जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले असून, वनताराच्या टीम नेही जिल्हा पोलिस प्रमुखांच्या उपस्थितीत बैठकस्थळी प्रवेश केला आहे.
या बैठकीकडे ना केवळ कोल्हापूर जिल्ह्याचे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. बैठकीत माधुरी (महादेवी) हत्तीणीच्या स्थानांतरणाच्या निर्णयावर चर्चा होणार असून, तडजोडीच्या कोणत्याही प्रस्तावाला स्थानिक ग्रामस्थ आणि जैन बांधवांनी स्पष्ट नकार दिला आहे. ” तडजोड नको, महादेवीच पाहिजे ” अशी ठाम मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे.
दरम्यान, नांदणी गावात हजारो स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.
राजकीय वर्तुळातही या प्रकरणाची तीव्र दखल घेतली जात आहे. काही राजकीय नेते “नवीन हत्ती देतो, मठासाठी आर्थिक मदत करतो” अशा योजनांच्या माध्यमातून संताप शमवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीशीही हा मुद्दा जोडला जात असून, याचा राजकीय वापर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आता ही बैठक कोणत्या निर्णयावर येते, यावर पुढील संघर्ष टळतो की तीव्र होतो, हे ठरणार आहे. महादेवी हत्ती मठात परत येईल का? याचं उत्तर मिळेपर्यंत संपूर्ण जिल्हा आणि समाजाच्या भावना ताणत राहणार आहेत.
—————————————————————————————-



