मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांची घोषणा केली. या निर्णयांमुळे आरोग्य सेवेला गती मिळणार असून महिलांच्या उद्योग वसाहतीला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.
प्रमुख निर्णय असे :
-
कर्करोग उपचारासाठी मोठा निर्णय : मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात १०० खाटांचे रुग्णालय उभारले जाणार असून यासाठी लागणारे मुद्रांक शुल्क सरकारने माफ केले आहे.
-
महिला औद्योगिक वसाहतीसाठी जमीन : कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेडला कसबा करवीर बी वॉर्ड येथील गट क्र. ६९७/३/६ मधील २ हेक्टर ५० आर जमीन देण्यास मान्यता.
-
अतिक्रमणाला नियमबद्ध मान्यता : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास मंजुरी.
-
कर्मचाऱ्यांना दिलासा : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट-क (तांत्रिक) संवर्गातील विविध पदावर २९ दिवस तत्त्वावर कार्यरत असलेल्या १७ कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यास मंजुरी.