कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अखेर अभियांत्रिकी पदवीच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आता एकूण चार केंद्रिभूत प्रवेश फेऱ्या (CAP Rounds) राबवण्यात येणार आहेत. यापूर्वी ही प्रक्रिया केवळ तीन फेऱ्यांमध्ये पूर्ण होत होती.
… तर फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही : या वर्षीपासून पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत अनुक्रमे एक, तीन आणि सहा पसंतीक्रमांपैकी जर कुठलेही एक महाविद्यालय मिळाले, तर संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश त्या महाविद्यालयासाठी ‘लॉक’ होईल. म्हणजेच त्याला त्या जागेवर प्रवेश घ्यावा लागेल व पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. यामुळे विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरताना अधिक सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संस्थात्मक फेरी केवळ चौथ्या फेरीनंतरच : चार CAP फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरच संस्थात्मक प्रवेश फेरी (Institutional Round) घेतली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे याही फेरीतील प्रवेश गुणवत्तेनुसारच दिले जाणार आहेत. यामुळे महाविद्यालयांना मनमानी करता येणार नाही.
ऑनलाईन अर्जाची सुविधा : जर संस्थात्मक फेरीत एखाद्या संस्थेने विद्यार्थ्याचा अर्ज नाकारला, तर तो विद्यार्थी CET कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावरून देखील पुन्हा अर्ज दाखल करू शकतो. यामुळे विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळणार असून प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकता अधिक वाढेल.
शासनाचा उद्देश : या नव्या नियमांमुळे प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता, गतीशीलता व शिस्त येण्याची अपेक्षा असून विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी अधिक सावधपणे आणि नियोजनपूर्वक निर्णय घेण्याचे आवाहन शासकीय स्तरावरून करण्यात आले आहे.






