मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महिला सक्षमीकरण हे कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा पाया असून महिलांना अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनवल्यास देशाची आर्थिक स्थिती अधिक बळकट होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महिलांच्या ५० टक्के सहभागाशिवाय राष्ट्राचा सर्वांगीण विकास शक्य नसल्याचे ते म्हणाले.
मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात आयोजित रक्षाबंधन उत्सवात मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी १० जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’ उभारले जाणार आहेत. या मॉल्समुळे बचत गटांतील महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल आणि त्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ बेटी बचाओ, बेटी पढाओ ’ आणि ‘ मुद्रा योजना ’ सारख्या उपक्रमांचा उल्लेख करत फडणवीस यांनी सांगितले की, मुद्रा योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी ६० टक्के महिला आहेत, ज्यामुळे लाखो महिलांना स्वावलंबी होण्यास मदत झाली आहे.
महिला शिक्षणाच्या संदर्भात त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने मुलींसाठी ‘ केजी टू पीजी ’ पर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत केले आहे. यामुळे उच्च शिक्षणात मुलींचा सहभाग वाढला असून विद्यापीठांत गोल्ड मेडल मिळवणाऱ्या मुलींची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.
याशिवाय, ‘ लखपती दीदी’ योजने अंतर्गत महाराष्ट्रात गेल्या वर्षी २५ लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट साध्य झाले असून, यावर्षी पुन्हा २५ लाख महिलांना लखपती बनवण्याचा आणि पुढील काळात राज्यातील एकूण १ कोटी महिलांना या श्रेणीत आणण्याचा संकल्प सरकारने केला आहे.
‘ लाडकी बहीण ’ योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपये देण्यात येतात. ही योजना पुढील पाच वर्षे अखंड सुरू ठेवली जाणार असल्याची घोषणा करून फडणवीस यांनी उपस्थित महिलांना आनंदाची भेट दिली. महिलांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकार सदैव पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही देत त्यांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
—————————————————————————————————