प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गसंपन्न भागांवर परप्रांतीय गुंतवणूकदारांचा वाढता डोळा पाहता, आता स्थानिक भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत. दोडामार्ग तालुक्यातील कोलझर गावातील ग्रामस्थांनी परप्रांतीयांना जमीन न विकण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, “जमीन विकायचीच झाली तर ती केवळ रक्ताच्या नात्यातील व्यक्तीलाच विकली जाईल,” अशी ठाम भूमिका ग्रामदैवताच्या साक्षीने घेतलेल्या शपथेच्या माध्यमातून जाहीर केली आहे.
दिल्ली लॉबीविरोधात गावकरी एकवटले
कोलझर येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी परप्रांतीय गुंतवणूकदार, विशेषतः दिल्ली, गुजरात, हरियाणा व केरळ येथील बड्या गुंतवणूकदारांकडून स्थानिक दलालांच्या माध्यमातून जमिनी खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. पैशांचे आमिष दाखवून जमिनी बळकावल्या जात असून, निसर्गरम्य भागात रस्ते तयार करून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
इको-सेन्सेटिव्ह झोनमध्ये धोकादायक घुसखोरी
वनशक्ती संस्थेचे कार्यकर्ते स्टॅलिन दयानंद यांनी सांगितले की, “कोलझर परिसर हा इको-सेन्सेटिव्ह झोन आणि व्याघ्र कॉरिडॉरमध्ये येतो. परप्रांतीय गुंतवणूकदार ही सह्याद्रीसाठी कीड असून, जमिनी विकल्या गेल्यास गावपण, जंगल आणि पर्यावरण कायमचे नष्ट होईल.”
त्यामुळे जमिनींची विक्री, वृक्षतोड आणि खनिजयुक्त मातीचे उत्खनन याविरोधात कायदेशीर लढा उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
समन्वय समिती आणि शास्त्रीय मॅपिंगची मागणी
पर्यावरणवादी कार्यकर्ते संदीप सावंत यांनी व्याघ्र कॉरिडॉरमधील गावांची समन्वय समिती स्थापन करण्याचे आवाहन केले. तसेच पर्यावरण रक्षणासाठी गावांचे शास्त्रीय मॅपिंग करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तरुणाईचा ठाम सूर
यावेळी बोलताना स्थानिक तरुणांनी सांगितले की, “जमीन विकून मिळणारा पैसा क्षणिक असतो; मात्र निसर्ग टिकला तर पर्यटन, शेती आणि नैसर्गिक संसाधनांमधून पिढ्यानपिढ्या समृद्धी मिळू शकते.”
मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित
या जनआंदोलनात देवस्थान कमिटीचे अध्यक्ष शामराव देसाई, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पी. पी. देसाई, माजी सरपंच प्रवीण देसाई, आप्पा देसाई, सुदेश देसाई, सिद्धेश देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
महसूल यंत्रणा परप्रांतीयांना अप्रत्यक्ष साथ देत असल्याचा आरोप करत, आता जनतेनेच आपली जमीन वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



