मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटप आणि महापौर पदावरून सुरू असलेल्या चर्चांना आता दिशा मिळू लागली आहे. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक स्पष्टवक्तेपणाने महत्त्वाचे संकेत दिले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी “फडणवीस ठरवतील तर महापौर पद शिंदे गटाला देऊ”, असे जाहीर करून राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण केली आहे.
रवींद्र चव्हाण म्हणाले, “मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर वरिष्ठ पातळीवर आमची कोअर टीम बसून चर्चा करणार आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तीनही नेते एकत्र बसून जागा वाटपाचं अंतिम सूत्र ठरवतील. या तिघांचाही राजकारणात प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या निर्णयावरच महापौर पदाचं सूत्र ठरेल. फडणवीस यांनी ठरवलं तर महापौर पद शिंदे गटाला देऊ शकतो.”
स्वतःच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत रविंद्र चव्हाण यांनी पक्षाबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. “ प्रदेशाध्यक्षपद ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. ही माझी पदोन्नतीच आहे. पक्षाने माझ्यावर खूप मोठा विश्वास दाखवला. मी युवा मोर्चाचा उपाध्यक्ष होतो. सामान्य घरातून आलेल्या एका कार्यकर्त्याला इतक्या मोठ्या पदावर नेणं ही भाजपचीच ओळख आहे. इतर पक्षांत हे घडत नाही. तेथे परिवारवाद आहे. पक्षाने माझ्यावर शंभर टक्के नव्हे तर त्याहूनही जास्त उपकार केले आहेत,” असे भावनिक शब्दांत त्यांनी आपली भावना मांडली.
महत्त्वाचे मुद्दे
-
मुंबई महापालिकेतील जागा वाटपाचा फॉर्म्युला फडणवीस-शिंदे-अजित पवार तिघे ठरवणार
-
महापौर पद शिंदे गटाला देण्याची तयारी, भाजप प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य
-
महायुती एकत्र निवडणुका लढणार, भाजपच्या नेतृत्वाची स्पष्ट भूमिका
-
रवींद्र चव्हाण यांचे पक्षाबद्दल कृतज्ञतेचे भावनिक वक्तव्य
ही भूमिका स्पष्ट झाल्यामुळे महायुतीतील संभाव्य मतभेद दूर होण्याची चिन्हं आहेत. येत्या काळात मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांमध्ये महायुतीची एकसंध लढत पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट दिसते.
—————————————————————————————-