आजचा काळ हा माहितीच्या महास्फोटाचा आहे. डिजिटल माध्यमे, विशेषतः सोशल मीडिया, आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. या माध्यमांमुळे संपूर्ण जग आपल्या बोटांच्या टोकावर आले असले तरी, यामुळे आपल्या सामाजिक वर्तनात एक खोल आणि सूक्ष्म बदल घडून आला आहे. माहितीचा वापर आपल्या समाजातील सहभागासाठी आणि ज्ञानवृद्धीसाठी व्हायचा, परंतु आता तो अधिकाधिक स्वतःच्या प्रतिमेच्या निर्मितीसाठी वापरला जातो. हीच स्थिती नव्या स्वरूपाच्या आत्मकेंद्रीपणाची सुरुवात दर्शवते.
सामाजिक वर्तनातील बदल :
पूर्वीच्या काळात लोक आपल्या वैयक्तिक अनुभवांबद्दल निवडक लोकांशी संवाद साधायचे कुटुंब, मित्र, किंवा समाजमाध्यमांमधून (offline). आज मात्र हे अनुभव खुलेपणाने सोशल मिडियावर मांडले जातात. या बदलाचा सामाजिक पातळीवर परिणाम असा झाला आहे.
1. सामाजिक संवादाचा हेतू बदलला आहे : आधी संवाद म्हणजे विचारांची देवाणघेवाण, अनुभवांची वाटचाल होती. आज संवादाचे प्रमुख उद्दिष्ट ‘लाइक’, ‘शेअर’, ‘रिअॅक्शन’ मिळवणे झाले आहे. व्यक्ती स्वतःचे विचार अधिक प्रमाणात “दिसण्यासाठी” मांडते, ऐकण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी नव्हे.
2. संबंधांची उथळता वाढली आहे : डिजिटल व्यासपीठांवर हजारो लोकांशी संपर्क असतो, पण त्यातल्या किती संबंधांमध्ये खरेपणा, भावनिक सखोलता असते? “कनेक्शन” वाढली आहेत, पण मैत्री, जवळीक, सहवास यांची खोली हरवली आहे.
3. सहानुभूती आणि ऐकण्याची ताकद कमी झाली आहे : सायकोलॉजिकल रिसर्चनुसार (जसे की मिशिगन युनिव्हर्सिटीचा 2010 चा अभ्यास), सहानुभूतीमध्ये लक्षणीय घट झाली आहे. यामागे सोशल मीडिया आणि सतत स्वतःच्या भावना मांडण्याची प्रवृत्ती जबाबदार आहे.
4. ‘व्हर्च्यू सिग्नलिंग’चा प्रभाव : सामाजिक वा राजकीय विषयांवर मतप्रदर्शन अनेकदा विचारपूर्वक न होता “दिसण्यासाठी” केलं जातं. आपण कोणत्या विचारसरणीला समर्थन देतो हे दाखवणं म्हणजेच सामाजिक सहभाग, अशी चुकीची समजूत झाली आहे.
5. खऱ्या आणि आभासी आयुष्यातील दरी वाढली आहे : डिजिटल आयुष्य अधिक सुंदर, यशस्वी आणि आनंदी दाखवण्याकडे झुकाव वाढलेला आहे. त्यामुळे समाजात अस्वस्थता, असमाधान, आणि नैराश्य वाढत आहे. व्यक्ती इतरांच्या “फिल्टर लावलेल्या” जीवनाशी स्वतःची तुलना करू लागते.
सांस्कृतिक संदर्भ आणि अभ्यास
शेर्री टर्कलच्या Alone Together या पुस्तकात ती म्हणते की आपण तंत्रज्ञानामुळे जोडले गेले असलो, तरी अधिक एकटे झालो आहोत. तिच्या मते, लोक आता वास्तविक संवादापेक्षा स्क्रीनमधील संवादाला प्राधान्य देतात, जे संबंधांच्या गाभ्यावर परिणाम करतं.
The Transparency Society मध्ये ब्युंग-चुल हान यांनी म्हटलं आहे की, माहितीच्या सतत प्रवाहामुळे माणूस स्वतःचं “प्रदर्शन करणारा वस्तू” झाला आहे. प्रत्येक कृती मागे “प्रेक्षक” असल्यासारखं वागणं सुरू झालं आहे — जणू आपलं संपूर्ण आयुष्य एका स्टेजवर घडतंय.
ट्वेंग आणि कॅम्पबेलच्या The Narcissism Epidemic नुसार, समाजाने वैयक्तिक यश, प्रसिद्धी आणि “स्वतःची ब्रँडिंग” यांना जेव्हा अधिक महत्त्व द्यायला सुरुवात केली, तेव्हापासून सहकार्य, साधेपणा आणि एकात्मतेसारख्या मूल्यांची हळूहळू घसरण झाली आहे.
सामाजिक पातळीवर परिणाम
या नव्या डिजिटल आत्मकेंद्रीपणामुळे अनेक गंभीर परिणाम समाजावर होऊ लागले आहेत :
- जनसंपर्कांचा फसव्या प्रतिमांवर आधारित असलेला पाया : अनेकदा सोशल मिडिया कनेक्शन हे प्रत्यक्ष भेटीशिवाय असतात, आणि त्यांच्यावर आधार ठेवता येत नाही.
- सामाजिक सहभागाची हानी : समाजासाठी किंवा सार्वजनिक हितासाठी प्रत्यक्ष कृती करण्याऐवजी, फक्त डिजिटल सहानुभूती पुरवली जाते.
- सामाजिक असमानतेचे दृश्य रूप : संपत्ती, सौंदर्य, आणि यशाच्या आभासी प्रतिमांमुळे वर्गविवेक वाढतो, ज्यामुळे आत्मभानाचा गोंधळ निर्माण होतो. आज माहिती आरशासारखी वागत आहे. पण तो आरसा केवळ आपली बाह्य प्रतिमा दाखवत नाही; तो आपली मानसिकता, सामाजिक भूमिका, आणि मूल्यं यांचंही प्रतिबिंब दाखवत आहे. जर आपण फक्त या आरशात स्वतःच पाहत राहिलो, तर आपल्यातला समाजमन हरवेल.
- हा बदल अपरिहार्य नाही ; तो आपल्याला जाणूनबुजून थांबवता येऊ शकतो जर आपण माहितीचा वापर “दिसण्यासाठी” नव्हे तर “समजून घेण्यासाठी” करायला सुरुवात केली, तर डिजिटल आरशात आपण समाज म्हणून अधिक सुसंवादी आणि सर्जनशील प्रतिमा पाहू शकतो.
– डाॅ.राजेंद्र पारिजात, कोल्हापूर
————————————————————————————–






