“हम को अब तक आशिकी का वो जमाना याद है…”
– (एक जनरेशन एक्स ची आतल्या मनातून नोंद)
हम को अब तक आशिकी का वो जमाना याद है.
हे शीर्षक वाचून कुणाला वाटेल की, हा कोणत्या जुन्या, चित्रपटसृष्टीतील प्रेमकथांचा संदर्भ आहे. पण मी सांगतोय तो काळ वेगळा आहे. तो माझा काळ आहे. मी त्या पिढीतला माणूस आहे. ज्याला आजच्या भाषेत ‘जनरेशन एक्स’ म्हणतात.
शाळा, कॉलेज, करिअर या टप्प्यांमध्ये माझ्या आयुष्यात अनेक मित्र-मैत्रिणी आले. कुणी हसवून गेले, कुणी रडवून. अनेकांनी आपल्या आयुष्यातील सुखदुःख, प्रेमाचे नाजूक धागे, गोंधळलेली नाती हे सगळं माझ्यासमोर उलगडून दाखवलं. त्या काळात प्रेम ही एखाद्या आदर्शाची, कल्पनारम्यतेची गोष्ट होती. दृश्य स्वरूपात फारसं काही नसायचं. शब्दांमध्ये, संकेतांमध्ये आणि मौनाच्या जागांमध्येच त्या भावना व्यक्त व्हायच्या.
त्यावेळी माझा एक उद्योजक मित्र मला मधून मधून विचारायचा – “मोकळा आहेस का ? चल ना जरा बाहेर.” मी हो म्हटलं की म्हणायचा, “सांगतो, चल.” आणि मग आम्ही स्कूटरवर बसून एखाद्या सार्वजनिक बागेत जायचो. मी स्कूटरवरच थांबायचो. काही वेळाने त्याची एक मैत्रीण तिथे यायची, ते दोघं काही खुणांनी, हसण्याने एकमेकांशी संवाद साधायचे. मी त्या गप्पांत कधीच नसायचो. केवळ साक्षीदार. तो म्हणायचा, “ती खुणेने सांगते, मग मी अर्थ लावतो.” हे सगळं माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव होता — कुठून त्या खुणा चालत ? कोणतं आकर्षण होतं की एक मुलगी अशा खुलेपणाने, सार्वजनिक बागेत येते ?
कधी मी त्याला विचारायचो, “तू आणि ती काय बोलता?” तो म्हणायचा, “बोलत नाही रे… ती खुणा करते.” आणि त्या खुणांमधून एक नातं उभं राहतं. हा अनुभवच वेगळा होता. मी फक्त पाहणारा होतो, शिकलो तरी खूप.
आजही आठवतं, जेव्हा मी शिकवत होतो तेव्हा ग्रामीण भागातील मुली सांगायच्या. “सर, आमच्याकडे अजूनही मुलगा-मुलगी बोलले तरी विचित्र नजरेने पाहतात.” मुलं-मुली एकत्र यायला लागलीत. शिक्षणासाठी, खेळासाठी, नाटक, संगीतासाठी. कुणाला ज्ञान हवं असतं, कुणाला आत्मविश्वास, कुणाला मोकळेपणाचा आधार. पण त्यांच्यातलं नातं लगेच प्रेमाचं आहे, लग्नाचं आहे, असं ठरवून मोकळं होणं खूप चुकीचं आहे.
आजची पिढी डेमोग्राफिक डिव्हीडंट आहे म्हणजे देशाच्या उर्जेचा खरा स्रोत. त्यांच्या अडचणी, गरजा, स्वप्नं आणि ताकदी यांना समजून घेतल्याशिवाय आपण त्यांचं खरं मोल ओळखू शकत नाही. पिढी कुठलीही असो. त्यांचं ऐकणं, समजून घेणं आणि त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणं फार गरजेचं आहे.
माझ्या त्या काळात, प्रेमाची, मैत्रीची भाषा सूचक होती. मी एकदा माझ्या मित्राच्या वतीने व सांगण्यावरून एका मुलीला पुस्तक दिलं “मैत्रीण”. एक छोटं पुस्तक, पण त्याच्या (मित्राच्या) भावना त्या शीर्षकातच लपल्या होत्या. आज कदाचित एखादा थेट ‘प्रपोज’ करेल, पण तेव्हा हीच भावना सांगताना शब्दांची नाजूक निवड आणि शैली असायची.
त्या मुलीशी मी स्पष्टपणे बोललो, “हे पुस्तक काय सांगतं?” आणि ती हसत म्हणाली, “अरे, मुलांना जसं वाटतं तसं मुलींनाही वाटतं. कधी कधी तसंच वाटतं, कधी वेगळंच वाटतं. प्रत्येकाची भावना वेगळी असते.”
प्रेम, मैत्री, नाती… या सगळ्यांचं एकसंध सूत्र शोधणं कठीणच असतं. पण त्या शोधातच माणूस स्वतःला, दुसऱ्याला, आणि जगण्याला समजून घेत असतो.
आणि म्हणूनच…
” हम को अब तक आशिकी का वो जमाना याद है…”
कधी कधी असं वाटतं की भूतकाळाच्या आठवणी या फक्त जुन्या गोष्टींचं स्मरण नसून, त्या माझ्या आतल्या माणसाला पुन्हा एकदा जागं करतात. प्रेम, मैत्री, नाती यांचं स्वरूप बदललं असेल, पण भावना आजही तितक्याच खोल आहेत.
मी ज्या काळात जगलो, त्या काळात बोलण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या, नाती समजून घ्यायला वेळ लागायचा, पण त्या नात्यांमध्ये एक खास सूक्ष्मता, नजाकत होती. ती आजही मला भावते.
आजच्या तरुण पिढीला बघताना वाटतं हो, हे वेगळं आहेत, पण यांनाही तितकंच प्रेम, आधार, ओळख हवी आहे. फक्त ते वेगळ्या भाषेत बोलतात, वेगळ्या पद्धतीनं जगतात.
आणि म्हणूनच, मी स्वतःला सतत सांगतो पिढी कुठलीही असो, माणूस म्हणून त्याला समजून घेणं, ऐकणं आणि स्वीकारणं हाच आपल्या अनुभवाचा खरा अर्थ आहे.
काळ बदलला… पण त्या काळातली माणुसकी, समजूत आणि नात्यांची उब ती अजून मनात खोल कुठेतरी जपलेली आहे.
डाॅ.राजेंद्र पारिजात, कोल्हापूर
————————————————————————————-