मुंबई : विशेष प्रतिनिधी
मी महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय नेत्याला ओळखत नाही. मी फक्त आशिष शेलार यांना ओळखते असे म्हणत सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांनी ठाकरे कुटुंबीयांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबतच्या चर्चेवर प्रतिक्रिया विचारली असता अशा भोसले यांनी थेट आपण राजकारण्यांना ओळखतच नसल्याचे सांगितल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात ५ जुलैला मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. या संदर्भात ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना एका कार्यक्रमात प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या की, मी केवळ आशिष शेलार या राजकीय नेत्याला ओळखते. बाकी कोणत्याही नेत्याला मी ओळखत नाही.
वास्तविक मंगेशकर कुटुंबीय ठाकरे कुटुंबीयांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. राज ठाकरे आणि आशा भोसले यांचे तर अतिशय निकटचे संबंध आहेत. मात्र असे असताना आपण कोणत्याही राजकीय नेत्याला ओळखत नाही असे सांगून भोसले यांनी ठाकरे कुटुंबीयांना जवळपास नाकारले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला असून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
——————————————————————————————






