Indonesian Consul General Eddie Wardoyo was speaking at a meeting on trade and industrial relations held at the Kolhapur Engineering Association Hall.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भारत आणि इंडोनेशिया या दोन देशांतील व्यापारी, औद्योगिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होत असून कोल्हापुरातील उद्योगपतींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इंडोनेशियाचे कौन्सिलेट जनरल एडी वार्डोयो यांनी येथे केले. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन सभागृहात आयोजित व्यापारी व औद्योगिक संबंध विषयक बैठकीत ते बोलत होते.
वार्डोयो म्हणाले की, कोल्हापूर हा औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचा भाग असून येथील अभियांत्रिकी उत्पादने, साखर उद्योगातील सुटे भाग, वस्त्रोद्योग, पॅकिंग मटेरियल यांसारख्या क्षेत्रांतील उत्पादने इंडोनेशियात निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात संधी निर्माण करू शकतात. काही स्थानिक उद्योजक या क्षेत्रात यशस्वी झाले असून आणखी अनेकांनी पुढे यावे, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. चर्चेमध्ये अश्विन दनिगोंड, मनोज झंवर, संजय पेंडसे, कमलाकांत कुलकर्णी, धैर्यशील पाटील, रोनक शहा, जयेश ओसवाल, सचिन शिरगावकर, हर्षवर्धन मालू, अतुल मालपाणी आदी उद्योजकांनी सहभाग घेतला.
इंडोनेशियाच्या कौन्सिलेटच्या अर्थशास्त्र विभाग प्रमुख इको ज्युनॉ यांनी भारत-इंडोनेशिया व्यापार संबंधांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आशियाई प्रदेशात इंडोनेशिया भारताचा तिसरा सर्वात मोठा निर्यातदार आणि सर्वात मोठा आयात भागीदार आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये या दोन देशांतील द्विपक्षीय व्यापार २८.१६ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका झाला. त्यापैकी भारताची निर्यात ५.३८ अब्ज अमेरिकन डॉलर्स होती.
भारतात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीत इंडोनेशियाचे स्थान ३७ वे असून, एकत्रित एफडीआय रक्कम ६५९.३० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. भारतातून इंडोनेशियाला जाणाऱ्या प्रमुख वस्तूंमध्ये अभियांत्रिकी वस्तू (१.९४ अब्ज डॉलर), पेट्रोलियम उत्पादने (६९२.१६ दशलक्ष डॉलर), रसायने, तेलबिया आणि इतर विविध वस्तूंचा समावेश आहे.
दोन्ही राष्ट्रांनी १६ जुलै २०२३ रोजी नव्या व्यापार चॅनेलला प्रारंभ केला असून, आर्थिक व वित्तीय संवादांतर्गत गुंतवणूक, वित्तीय सेवा आणि पायाभूत सुविधा विकासावर विशेष भर दिला जाणार आहे.
भारत-इंडोनेशियाचे दोन हजार वर्षांहून जुने सांस्कृतिक संबंध असल्याने सागरी शेजारी व धोरणात्मक भागीदार म्हणून या दोन्ही देशांमध्ये भविष्यातील सहकार्याच्या प्रचंड संधी आहेत, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.