कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क

पॉप गायक, पत्रकार, शास्त्रज्ञ आणि चित्रपट निर्मात्यासह विविध क्षेत्रांतील प्रतिभावान आणि धाडसी महिलांची एक आंतरराष्ट्रीय टीम आज (१४ एप्रिल) अंतराळाच्या दिशेने झेपावणार आहे. आतापर्यंतच्या अंतराळ प्रवासातील हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे.
प्रख्यात उद्योजक जेफ बेझोस यांची स्पेस कंपनी ब्लू ओरिजिन सहा महिलांची ही संपूर्ण टीम ‘न्यू शेपर्ड रॉकेट’च्या माध्यमातून अंतराळात पाठवणार आहे. महिलांची संपूर्ण टीम अंतराळात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी रशियन अंतराळवीर व्हॅलेंटिना तेरेशकोव्ह यांनी १९६३ मध्ये एकट्याने अंतराळात प्रवास केला होता.ब्लू ओरिजिनने आयोजित केलेल्या या सहलीमध्ये पॉप गायिका कॅटी पेरी, पत्रकार गेल किंग, नागरी हक्क वकील अमांडा इंग्वेन, नासाच्या माजी रॉकेट शास्त्रज्ञ आयशा बोवे आणि चित्रपट निर्माते कॅरियन फ्लिन हे सहभागी होणार आहेत.समूहातील सहावी महिला लॉरेन सांचेझ या आहेत. ते या टीमचं नेतृत्व करतील. त्या जेफ बेझोसच्या मैत्रीण आहेत.या सर्व महिला कार्मन रेषा ओलांडतील. कार्मन रेषा ही पृथ्वी आणि अंतराळ यांच्यातील एक काल्पनिक सीमा आहे. ती पृथ्वीच्या वातावरणापासून दूर आहे.
महिलांचा अवकाश प्रवास
या सहा महिला न्यू शेपर्ड-३१ नावाच्या या मोहिमेवर ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड रॉकेटमधून प्रवास करतील.रॉकेटच्या आत असलेलं अंतराळ यान पूर्णपणे स्वयंचलितपणे (ऑटोमेटिक) कार्य करू शकतं. म्हणजेच अंतराळयान चालवायला आत कोणीही नसेल.हा प्रवास अंदाजे ११ मिनिटांचा असेल. त्या कार्मन सीमेत काही मिनिटं गुरुत्वाकर्षणाशिवाय वजनहीनता (शून्य वजन) अनुभवतील.या सर्व महिला अंतराळातून पृथ्वीच्या विलोभनीय दृश्याचा आनंद घेतील आणि त्यानंतर पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरू करतील.न्यू शेपर्ड रॉकेट १४ एप्रिल (सोमवार) आज रोजी अमेरिकेतील वेस्ट टेक्सास येथील कंपनीच्या प्रक्षेपण केंद्रातून अवकाशात पाठवलं जाईल.लॉरेन सांचेझ यांनी व्होग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत २०२३ मध्ये महिलांच्या अंतराळ उड्डाणाच्या स्वप्नाचा उल्लेख केला होता.ब्लू ओरिजिननं एका निवेदनात म्हटलं आहे, “ही केवळ एक अंतराळ मोहीम नाही. लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठीचं हे मिशन आहे.”
कार्मन सीमा म्हणजे काय?
कार्मन सीमा (रेषा) ही एक काल्पनिक सीमारेषा आहे. पृथ्वीवरील समुद्रसपाटीपासून १०० किमी उंचीवर आहे, अशी त्याची व्याख्या आहे.पृथ्वीपासून अंतराळापर्यंतचा प्रवास जिथे सुरू होतो तो बिंदू कार्मन सीमा मानला जातो. म्हणजेच हा बिंदू पृथ्वीच्या वातावरणाचा शेवट आणि अवकाशाची सुरुवात मानला जातो.कार्मन रेषा ही फेडरेशन अॅरोनॉटिक इंटरनॅशनलने निश्चित केली होती आणि ही उंची गाठणं हा अवकाश-संबंधित संशोधनातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.मोहाली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचे प्राध्यापक आणि माजी शास्त्रज्ञ डॉ. टी.व्ही. व्यंकटेश्वरन म्हणतात, “आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारल्या गेलेल्या नियमांनुसार, ही अंतराळाची व्याख्या आहे. हीच कार्मन रेषा आहे.”त्यांच्या मते १०० किमी उंचीच्या खाली ९९.९ टक्के वातावरण अस्तित्त्वात आहे, त्याला कार्मन सीमा म्हणून निर्धारित केलं गेलं आहे. त्यामुळं यावरील भाग हा अंतराळ आहे असं ठरवण्यात आलं.जे लोक या सीमेपलीकडे प्रवास करतात त्यांना ‘अंतराळवीर’चा दर्जा प्राप्त होतो. त्यामुळंच ब्लू ओरिजिनची अंतराळ मोहीमही या मर्यादेच्या पलीकडे जाऊन प्रवाशांना अवकाशाचा खरा अनुभव देणार आहे.
स्पेस टुरिझमला चालना देणं हा उद्देश‘
या मोहिमेचा उद्देश अवकाश पर्यटनाला चालना देणे आहे, असं डॉ. व्यंकटेश्वरन म्हणतात.ते म्हणतात, “या कंपनीनं अनेक वेळा अंतराळ पर्यटन केलं आहे. पण जेव्हा तुम्ही या सहलीबद्दल किंवा मोहिमेबद्दल ऐकता तेव्हा तुम्ही सुनीता विल्यम्स यांच्यासारखीच ही मोहीम आहे, असं समजू नये.”सुनीता विल्यम्स अंतराळाच्या अशा एका भागात गेल्या होत्या जे सुमारे ४०० किलोमीटर वर होते.या महिलांच्या अंतराळ उड्डाणाचे वर्णन करताना ते म्हणाले, “ते कार्मन सीमेच्या वर जिथे अंतराळ सुरू होते तिथं जातील आणि नंतर काही मिनिटांतच परत येतील.”व्यंकटेश्वरन म्हणाले, “या प्रवासाचा एकूण वेळ सुमारे ११ मिनिटांचा असेल. त्या सात मिनिटं रॉकेटमध्ये प्रवास करतील. सुमारे ४८ किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर प्रवाशांना घेऊन जाणारं हे यान जसं दगड वरच्या दिशेने फेकले जातात, अशा प्रकारे रॉकेटमधून अंतराळात सोडलं जाईल.”त्यांनी सांगितलं, “रॉकेटमधून प्रक्षेपित केलेलं अंतराळ यान कार्मन रेषेच्या अगदी वर जाईल आणि नंतर पृथ्वीवर परत येईल.”लोकांना अवकाश पर्यटनाकडे आकर्षित करणं आणि त्यातून नवीन उद्योग निर्माण करणं हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे ते सांगतात. याशिवाय, अशा प्रयत्नांमुळे “महिलांच्या विकासावर लक्ष केंद्रित होईल आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणा बनेल.”
अंतराळात जाणाऱ्या महिला कोण आहेत?
लॉरेन सांचेझ
लॉरेन सांचेझ या एक परवानाधारक हेलिकॉप्टर पायलट आहेत. सांचेझ यांनी २०१६ मध्ये ब्लॅक ऑप्स एव्हिएशनची स्थापना केली होती. त्या बेझोस अर्थ फंडाच्या उपाध्यक्षा आहेत. त्या तीन मुलांच्या आई आहेत.
आयशा बोवे
आयशा बोवे या मूळच्या बहामाच्या आहेत. नासाच्या माजी रॉकेट वैज्ञानिक असलेल्या आयशा या उद्योजक, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित आदी विषयांमध्ये सक्रिय आहेत.आयशा ‘स्टेम बोर्ड की’ या इंजिनिअरिंग कंपनीच्या सीईओ देखील आहेत. त्यांना दोनदा आयएनसी ५००० मध्ये सूचीबद्ध करण्यात आलेलं आहे. ही अमेरिकेतील सर्वात वेगाने वाढणाऱ्या खासगी कंपन्यांची यादी आहे.त्यांनी ‘लिंगो’ नावाची कंपनी देखील स्थापन केली आहे. या कंपनीचं उद्दिष्ट १० लाख विद्यार्थ्यांना आवश्यक तांत्रिक कौशल्यं शिकवणं आहे.
अमांडा इंग्वेन
अमांडा या बायोस्पेस रिसर्च सायंटिस्ट आहेत. त्यांनी हार्वर्डमधून बॅचलर डिग्री घेतली आहे. त्यांनी हार्वर्ड सेंटर फॉर ॲस्ट्रोफिजिक्स, एमआयटी, नासा येथे संशोधन कार्यही केलं आहे.अमांडा यांनी १९८१ ते २०११ या काळात नासाच्या अंतराळ मोहिमेत काम केलं आहे.त्यांनी लैंगिक हिंसाचाराच्या पीडितांसाठी खूप काम केलं आहे. त्यासाठी त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. त्यांना २०२२ मध्ये टाईम मॅगझिनचा वुमन ऑफ द इयर पुरस्कार देखील मिळाला आहे.
कॅटी पेरी
पॉप गायिका कॅटी पेरी ही जगातील यशस्वी कलाकारांपैकी एक आहे. तिच्या म्युझिक अल्बम्सची सर्वाधिक विक्री होते. ऑनलाइन माध्यमांत तिची गाणी ११५ अब्जपेक्षा जास्त वेळा पाहिली गेली आहेत.जागतिक पॉप सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणारी कॅटी अनेक मानवतावादी मुद्द्यांवर पुढाकार घेत असते. युनिसेफची सदिच्छा दूत या नात्यानं ती प्रत्येक बालकाचे आरोग्य, शिक्षण, समानता आणि सुरक्षिततेचा हक्क निश्चित करण्यासाठी आवाज उठवत असते.
गेल किंग
गेल किंग या एक पुरस्कार विजेत्या पत्रकार आहेत. त्या सीबीएस मॉर्निंग्सच्या को-होस्ट आणि ओप्रा डेलीच्या संपादक आहेत.पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवाच्या आधारे, गेल यांना मुलाखतींमध्ये अर्थपूर्ण संभाषण करण्यात तज्ज्ञ मानलं जातं.
कॅरियन फ्लिन
फॅशन अँड ह्युमन रिसोर्सेसमध्ये बॅचलर डिग्री मिळवल्यानंतर, कॅरियन फ्लिन यांनी मागील १० वर्षांत ॲलन-स्टीव्हन्सन स्कूल, द हाय लाइन आणि हडसन रिव्हर पार्कसह अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत स्वयंसेवक म्हणून काम केलं आहे.स्टोरी टेलिंगच्या (कथाकथन) सामर्थ्याची जाणीव असलेल्या कॅरियन यांनी विचार करायला लावणाऱ्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. यामध्ये हॉलिवूडमधील महिलांच्या इतिहासाचा शोध घेणारे ‘दिस चेंज एव्हरीथिंग’ (२०१८) आणि ‘लिली’ (२०२४) या वकील लिली लेडबेटर यांच्यावर आधारित चित्रपटाचा समावेश आहे.



