अमोल शिंगे : प्रसारमाध्यम न्यूज
राज्याच्या राजकारणात सध्या मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांच्या युतीची चर्चा आहे. याबाबत दोन्ही पक्षांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी इच्छाही दोन्ही पक्षातील नेत्यांनी व्यक्त केली आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास महाराष्ट्राला फायदा होईल असं विधान अनेकांनी केलं आहे. आज आपण हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास दोन्ही पक्षांची ताकद किती वाढेल? या दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी काय आहे? यावर आपण एक दृष्टीक्षेप टाकू..
राज ठाकरे यांना एका मुलाखतीत मनसे-शिवसेनेच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना राज यांनी, ‘एकत्र येऊन राहणे मला कठीण वाटत नाही. महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या अस्तित्वासाठी आमचे वाद आणि भांडणे खूपच लहान आहेत’ असे विधान केले होते. तेव्हापासून राज आणि उद्धव यांच्या युतीची चर्चा सुरु झाली. यानंतर उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देऊन महाराष्ट्रातील लोकांना जे हवे आहे ते होईल असं म्हटलं होतं. त्यामुळे या युतीच्या चर्चांना अधिक जोर आला. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांच्या कार्यक्रमांमध्ये भेटीगाठीही झाल्या. मात्र अजून युतीचा निर्णय अंतिम झालेला नाही.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आत्ताच ऐरणीवर येण्याचं प्रमुख कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक.. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महायुती सत्तेत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीकोनातून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची ताकद मोठी दिसून येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत असला तरी त्यांची मुंबईत फार ताकद नाही. २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी एकसंघ असताना त्यांना निव्वळ ९ जागा मिळाल्या होत्या. भाजपला आणि शिंदे गटाला आवर घालायचा असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र यावे लागेल, अशी चर्चा सर्वच स्तरातून होत आहे. उद्धव आणि राज एकत्र आल्याने खरंच महायुतीला शह बसेल का? उद्धव ठाकरे यांना मुंबईची सत्ता काबीज करण्यासाठी फक्त मनसेचीची साथ घ्यावी लागेल की महाविकास आघाडी पण त्यात सामील करून घावी लागेल? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपणाला मुंबई महानगरपालिकेच्या मागील दोन निवडणुकांच्या आकडेवारीचा विचार करावा लागणार आहे.
आपण पहिल्यांदा सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीची आकडेवारी पाहू..
पक्षाचे नाव |
संख्याबळ |
शिवसेना |
७५ |
भारतीय जनता पार्टी |
३१ |
राष्ट्रीय कॉंग्रेस |
५२ |
राष्ट्रवादी कॉंग्रेस |
१३ |
मनसे |
२८ |
सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष होता तर कॉंग्रेस हा दोन नंबरचा मोठा पक्ष होता. राज ठाकरे यांच्या मनसेला २८ जागा मिळाल्या होत्या.
२०१७ च्या निवडणुकीची आकडेवारी :
पक्षाचे नाव |
संख्याबळ |
शिवसेना |
८४ |
भारतीय जनता पार्टी |
८२ |
राष्ट्रीय कॉंग्रेस |
३१ |
राष्ट्रवादी कॉंग्रेस |
९ |
मनसे |
७ |
सन २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनाच सर्वात मोठा पक्ष होता तर यावेळी भाजप दोन नंबरचा मोठा पक्ष होता. या निवडणुकीत मनसेचे संख्याबळ २८ वरून घसरून ७ वर आले. वरील सर्व आकडेवारी पाहिली तर मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवायची असेल तर फक्त राज ठाकरे यांच्यावर अवलंबून राहून चालणार नाही तर महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची पण साथ घ्यावी लागेल. ही झाली आकडेवारी पण मुंबई शहर पाहता या शहरावर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ठाकरे घराचा मोठा प्रभाव आहे. ठाकरे घर हे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. उद्धव आणि राज यांच्या भांडणात मुंबईचं नुकसान होत असल्याच्या भावना आहेत. या दोघांनी मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र यावं अशी सुद्धा भावना सामान्य मुंबईकरांची आहे. या परिस्थिती जर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि सामान्य मुंबईकरांमध्ये एक सकारात्मक उर्जा निर्माण होईल आणि त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल.
आता आपण या दोघांच्या युतीकडे महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून पाहू.
गेल्या काही निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांची कामगिरी खराब झाल्याचे दिसत आहे. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने ९५ जागांवर उमेदवार उभे केले होते यातील २० जागा जिंकण्यात पक्षाला यश आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला १० टक्के मते मिळाली होती. तर राज ठाकरे मनसेने १२५ जागांवर निवडणूक लढवली होती मात्र पक्षाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही आणि पक्षाला १.६ टक्के मते मिळाली होती.
राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्मान सेना या पक्षाने 2009 च्या विधानसभा निवडणुकीतून पदार्पण केले होते. पहिल्याच या निवडणुकीत पक्षाला १३ जागा मिळाल्या होत्या. तसेच पक्षाला ५.७ टक्के मते मिळाली होती. याच निवडणुकीत शिवसेनेने १६.३ टक्के मतांसह ४४ जागा जिंकल्या होत्या.
२००९ नंतर राज ठाकरे यांच्या पक्षाची कामगिरी घसरली असल्याचे दिसत आहे. २०१४ च्या महाराष्ट्र निवडणुकीत मनसेने २१९ जागा लढल्या मात्र पक्षाला केवळ एक जागा मिळाली आणि मतांची टक्केवारीही ३.२ टक्क्यांपर्यंत घसरली. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीतही मनसेला २.३ टक्के मिळाली होती, आणि पक्षाचा फक्त एक आमदार निवडून आला होता.वरील सर्व आकडेवारी पाहिल्यानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र आले तरी मतांच्या टक्केवारीत फारसा फरक पडणार नसल्याचे दिसत आहे. मात्र दोन्ही पक्ष एकत्र आल्यास जे उमेदवारांचा कमी फरकाने पराभव झाला होता, तिथे विजय मिळू शकतो. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना फायदा होऊ शकतो.
———————————————————————————————–