कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट ६ जून रोजी जगभरातील चित्रगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केलं असून ह एक मल्टी स्टारर सिनेमा आहे. या सिनेमात तब्बल १८ लोकप्रिय कलाकार आहेत. ‘हाऊसफुल ५’च्या प्रमोशनवेळी अक्षय कुमारने स्टेजवर मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला, यामुळे प्रेक्षक झाले खुश झाले.
‘हाऊसफुल ५’ च्या पहिल्या दिवसाच्या कमाईनं अक्षय कुमारच्या ‘केसरी चॅप्टर २’ च्या पहिल्या दिवसाच्या कमाईला मागं टाकलं आहे आहे. ‘केसरी चॅप्टर २’ नं पहिल्या दिवशी ७.७५ कोटी रुपये कमावले होते. ‘हाऊसफुल ५’ चित्रपटानं पहिल्याच दिवशी जवळपास २३ कोटींच्या घरात कमाई केली आहे.
‘हाऊसफुल ५ए’ मध्ये शुक्रवारी हिंदी शोमध्ये एकूण २८.८८ टक्के प्रेक्षक होते, तर रात्रीच्या शोमध्ये सर्वाधिक ४५.६५ टक्के प्रेक्षक होते. ‘हाऊसफुल ५बी’ मध्ये त्याच दिवशी हिंदी शोमध्ये एकूण १६ टक्के प्रेक्षक होते, तर रात्रीच्या शोमध्ये २७.१८ टक्के प्रेक्षक होते.
चित्रपटाची कथा एका जहाजावर घडते, जिथं अनेक जण एका दिवंगत अब्जाधीशाचे पुत्र असल्याचा दावा करतात आणि त्यांची संपत्ती मिळवण्यासाठी स्पर्धा करतात. नंतर एक खून होतो आणि सिनेमात अनेक घडामोडी घडत जातात. या चित्रपटात अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांच्यासोबत अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ आणि नाना पाटेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.